पुणे : लॉकडाऊनमुळे बससेवा ठप्प असल्याने पीएमपी प्रशासनाने रोटेशन पध्दतीने कर्मचाऱ्यांना काम दिले जात आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना मे महिन्यात एक दिवसही काम मिळाले नाही. तसेच त्यांच्या पगारी रजाही एप्रिल महिन्यात संपल्या. परिणामी त्यांना मे महिन्याचे वेतनच मिळालेले नाही. तर महिन्यातील दोन-तीन दिवसच काम मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा हातात २००-३०० रुपये पडले आहेत. जून महिन्यातही हीच स्थिती कायम राहण्याची भीती आहे. त्यामुळे पुर्णवेळ व रोजंदारी कर्मचाऱ्यांची अवस्था एकसारखीच झाली आहे. केवळ पीएमपी वेतनावरच संसाराचा गाडा हाकणाऱ्या हे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत.
बससेवा बंद असल्याने पीएमपीला कोट्यावधी रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवा तसेच पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेल्या सेवेतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. सेवा बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना मे महिन्यात दोन-तीन दिवसच काम मिळाले आहे. तर काही कर्मचारी अजूनही कामाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने मे महिन्याच्या वेतनात मोठ्या प्रमाणावत कपात केली आहे. कर्मचाऱ्यांना काम केलेल्या दिवसाचे पुर्ण वेतन दिले आहे. पण उर्वरित दिवसाच्या रजा गृहित धरण्यात आल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचा रजा शिल्लक नाहीत, त्यांच्या बिनपगारी रजा लावण्यात आल्या आहेत. बहुतेक कर्मचाºयांना रोटेशन पध्दतीने काम देण्यात आल्याने कुणाचेही पुर्ण दिवस ड्युटी मिळालेली नाही. त्यामुळे बहुतेक कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मोठी कपात झाली आहे. काही कर्मचाऱ्यांना तर एक रुपयाही मिळालेला नाही. तर काहींच्या हातात केवळ २००-३०० रुपये आले आहेत. त्यामुळे त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.-------------कर्मचाऱ्यांना महिन्यात दोन-तीन दिवसच काम मिळत आहे. काहींना कामही मिळालेले नाही. उरलेले दिवस रजा गृहित धरल्या. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रशासनाने एक दिवसाचे वेतन कापले. त्यामुळे अनेकांच्या रजा शिल्लक नसल्याने त्यांना २००-३०० रुपये वेतन मिळाले आहे.- सुनिल नलावडे, सरचिटणीस, राष्ट्रवादी कामगार युनियन--------------पीएमपीचे संचलन बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत. काम केलेले दिवस आणि रजा गृहित धरून तेवढ्या दिवसाचे वेतन देण्यात आले आहे. याबाबत दोन्ही महापालिकांकडे मागणी केली आहे. पण सध्या संचलन बंद असल्याने संचलन तुटीचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे याबाबत वेगळा निर्णय घ्यावा लागेल. पुढील आठवड्यात संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.- अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी----------------महिनाभरात एकच दिवस काम मिळाले. त्यातून मुख्यमंत्री निधीही गेल्याने हातात केवळ ३४१ रुपये पडले आहेत. या पैशामध्ये घर कसे चालवायचे? आता एप्रिल महिन्यातच सर्व रजा संपल्या आहेत. आधी मी इथून गावाला पैसे पाठवत होतो. आता त्यांच्याकडून मागण्याची वेळ आली आहे.- एक वाहक---------------काम करण्याची तयारी असूनही एक दिवसही काम मिळाले नाही. एप्रिल महिन्यात सर्व रजा संपल्या. त्यामुळे मे महिन्याचे वेतनच मिळाले नाही. जून महिन्यातही काम मिळेल की नाही माहिती नाही. उसनवारी करूनच घरखर्च भागवावा लागेल. - काही कर्मचारी-----------------