पुणे : पीएमपीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी अचानक संप केल्याने प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय झाली. गेल्या चार महिन्यांपासून ठेकेदाराने वेतन दिले नसल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे सांयकाळी कामावरून सुटलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी तासंतास बसची वाट पाहावी लागत होती.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये १६०० हून अधिक पीएमपी बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. यातील ३०९ ई-बस आणि ६०० हून अधिक बस ठेकेदाराच्या आहेत. बुधवारी निगडी, औंध, स्वारगेट आणि न.ता वाडी डेपोतील ई-बसच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून वेतन मिळेपर्यंत बस न चालवण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणात नेमके कोण दोषी आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे.
कंत्राटदार आणि पीएमपी प्रशानाचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवणार...
पीएमपी बस चालवणारे कंत्राटदार आणि पीएमपी प्रशासन यांच्यात योग्य तो समन्वय नसल्याचे यावरून सिद्ध होते. या दोघांच्या निष्काळजीपणाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. काही कर्मचाऱ्यांचे डिसेंबर २०२१ पासूनचे वेतन मिळालेले नाही, काहींचे पाच महिन्यांपासून मिळालेले नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांनी घेतलेला पवित्रा योग्य असला तरी याचा विपरित परिणाम नागरिकांवर होत आहे. तसेच पीएमपीच्या ताफ्यात ५० टक्क्यांहून अधिक बस या ठेकेदारांच्या आहेत. ठेकेदार कधी त्यांना पीएमपीने पैसे दिले नाही म्हणून संप करतात तर कधी कर्मचारी वेतन दिले नाही म्हणून संप करतात. यात नागरिक विनाकारण भराडला जात आहे. पीएमपी प्रशासन सर्वच काही ठेकेदारांना देणार असेल तर भविष्यात नागरिकांना ठेकेदाराकडून वेगवेगळ्या कारणासाठी वेठीस धरले जावू शकते.
एक दिवसात जमा करा अन्यथा बेमुदत..
बुधवारी पुकारण्यात आलेल्या संपात २७१ पैकी फक्त १०० कर्मचारी सहभागी झाले होते. पण २५ ऑगस्ट (गुरूवार) रात्रीपर्यंत संपूर्ण वेतन मिळाले नाही तर आम्ही सगळे कर्मचारी संपावर जाऊ अशी समज देखील आमच्या कंत्राटदाराला आम्ही दिली आहे, तसेच जोपर्यंत आमचे वेतन आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत बस धावणार नाही असे देखील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
''आम्ही कात्रजला जाण्यासाठी पिंपरी स्थानकात दोन तास उभे होतो पण नंतर कळाले की चालकांनी संप केला असल्याने बस येणार नाही. काही बस चालू होत्या पण येणारी प्रत्येक बस ही तुडूंब भरून येत होती. अखेर मी आणि माझे सहकारी कॅब बुक करून घरी आलो. - आनंद गायकवाड, प्रवाशी''
''एमपी ट्रॅव्हल्स या कंत्राटदाराच्या केवळ १३ बस आणि दुसऱ्या एका कंत्राराटदाराच्या निगडी डेपोतील ६० ई-बस चालकांनी संप केला आहे. या बस बंद असल्याने आम्ही पर्यायी बसची व्यवस्था केली आहे. पण ठेकेदारांवर आम्ही दंडात्मक कारवाई करणार आहे.- दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक''