पुणे : महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या ५० रुपयांत दैनंदिन पासच्या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. केवळ दोनच दिवसांत बसच्या पासधारकांची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. ओळखपत्राची सक्ती नाही, सुट्या पैशांची झंझट नाही, तिकीट खरेदी केल्यासारखे पास खरेदी करा आणि हव्या त्या ठिकाणी प्रवास करा असे योजनेचे स्वरूप असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.महापालिकेने १४ आॅगस्टपासून ५० रुपयात दैनंदिन पास ही योजना सुरू केली आहे. हा पास पहाटे ५ पासून मध्यरात्री शेवट बस वेळेपर्यंत वैध आहे . ५० रुपयात दैनंदिन पास ही योजना सुरू होण्यापूर्वी पासधारकांची संख्या ३५०० इतकी होती सवलतीनंतर पासधारकांच्या संख्या ४ हजार ७०० इतकी वाढ झाली आहे. पासची योजना लागू करण्यापूर्वी पालिकेला पासमधून २ लाख ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, सवलतीनंतर हे उत्पन्न ३ लाख ७५ हजार इतके झाले आहे. पासधारकांच्या संख्येत ५०० टक्के इतकी वाढ व्हावी असे उद्दिष्ट पीएमपी प्रवासी मंचच्या वतीने ठेवण्यात आले असून त्याकरिता नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी, विवेक वेलणकर, सतीश शितोळे, संजय शितोळे, यतीश देवाडिगा यांनी दिली.बसचा प्रवास हा रिक्षापेक्षा महाग पडत होता, त्यामुळे नागरिकांकडून बसऐवजी रिक्षाला प्राधान्य दिले होते. ५० रुपयात पास उपलब्ध होत असल्याने नागरिक पुन्हा बसकडे वळू लागले आहेत. सध्याचे कमी अंतराचे ५० मार्ग वगळता उर्वरित ३००पेक्षा अधिक बस मार्गाचे एकेरी भाडे २५ रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच अनेक प्रवासी दिवसभरात त्याच किंवा इतर मार्गावर दोन किंवा अधिक वेळाही प्रवास करतात. ओळखपत्राची सक्ती नसल्याने एका प्रवाशाने पास खरेदी केल्यानंतर तो दुसऱ्याला हस्तांतरित करण्याचीही शक्यता आहे. मात्र पीएमपीकडून हस्तांतरित पासबाबत सूट ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.आयुक्तांनी केला प्रवासपुणे : महापालिकेचे आयुक्त व पुणे महानगर परिवहन मंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष कुणाल कुमार यांनी मंगळवारी बसचा ५० रुपयांचा दैनंदिन पास खरेदी करून बसमधून प्रवास केला. साधू वासवानी चौक ते सिमला आॅफिसपर्यंत बसमधून जाऊन त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. खुद्द आयुक्त आपल्यासोबत बसमधून प्रवास करीत असल्याचे पाहून प्रवाशांना या वेळी सुखद धक्का बसला. पीएमपीच्या वतीने १४ आॅगस्टपासून ५० रुपयांत बसचा पास ही योजना सुरू केली आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुणाल कुमार यांनी स्वत: बसचा दैनंदिन पास खरेदी करून बसमधून प्रवास केला. साधू वासवानी चौकातील बसस्टॉपवरून ते बसमध्ये चढले. या वेळी त्यांनी बसमधील प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या. दररोज बस वेळेवर येते का, बसचा प्रवास कसा वाटतो याची विचारणा त्यांनी प्रवाशांकडे केली. बसच्या कंडक्टर यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. या वेळी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, जनरल मॅनेजर अनंत वाघमारे उपस्थित होते. नागरिकांनी दुचाकीचा वापर कमी करून पीएमपीकडे जास्त संख्येने वळावे यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. लवकरच पीएमपीच्या ताफ्यात १५०० बस दाखल होणार आहेत. सर्व बसना जीपीएस सिस्टिम बसविण्यात आली आहे. पीएमपीचे अॅप सुरू करण्यात आले आहे, त्यामध्ये बस कधी येणार, ती सध्या कुठे आहे याची सविस्तर माहिती मिळणार आहे.
स्वस्त पासमुळे पीएमपी सुसाट
By admin | Published: August 17, 2016 1:30 AM