पिंपरी : ‘पीएमपीएमएल’ बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशास वाहकाने दिलेल्या तिकिटाची त्वरित नोंद होऊन ती माहिती सर्व्हरद्वारे कार्यालयास उपलब्ध होणार आहे. या ‘आॅनलाइन ई-तिकिटिंग’ प्रक्रियेमुळे तिकिटाच्या पैशांचा गैरव्यवहार रोखला जाणार असून, पारदर्शक कारभारासाठी ‘ई-तिकिटिंग’ यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रात आॅनलाइन कामकाजावर भर दिला जात आहे. अशीच प्रक्रिया ‘पीएमपीएमएल’ बसमधील ‘ई-तिकिटिंग’ यंत्रणेसाठीही सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. काही दिवसांपूर्वी ही प्रक्रिया सुरू केली. मात्र, ही सेवा ‘आॅफलाइन’ होती. आता हीच सेवा आॅनलाइन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे कामकाज पीएमपी प्रशासनाकडून सुरू आहे. वाहकाकडे असलेल्या यंत्रात मोबाईल सिमकार्डप्रमाणे चीप असेल. ही चीप सॅटेलाइटशी कनेक्ट असेल. या यंत्रावर तिकीट काढल्यास काही क्षणातच त्याबाबतची माहिती कार्यालयात समजणार आहे. दर तीस सेकंदाला यंत्रावरील ‘अपडेट’ कार्यालयात कळणार आहेत. सध्या कागदी तिकिटांच्या माध्यमातून जमा केलेल्या रकमेचा भरणा करताना वेळ वाया जातो. तिकिटाप्रमाणे वाहकाला हिशेब द्यावा लागतो. यामध्ये अनेकदा घोळही होतात. आता ई-तिकिटिंग यंत्र आल्यास रकमेचा भरणा करण्यासाठी वाहक आगारात पोहोचण्यापूर्वीच संबंधित वाहकाने जमा करावयाची रक्कम त्याला कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडून समजणार आहे. यामुळे वेळेची तर बचत होणारच, शिवाय हिशेबही तंतोतंत राहण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी यंत्राची चाचणी झाली आहे.अहवाल संचालक मंडळासमोर सादर करण्यात येणार असल्याचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.
पीएमपीच्या तिकिटाची सेकंदात मिळणार माहिती
By admin | Published: April 04, 2015 6:01 AM