पुणे : मागील पाच महिन्यांपासून बंद असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस सेवा गणेशोत्सवात सुरू होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बस सेवा सुरू करण्याबाबत होकार दिल्याचे समजते. त्यानुसार सुरुवातीला काही ठराविक मार्गांवर 450 बस मार्फत सेवा देण्याचे नियोजन पीएमपी प्रशासनाकडून केले जात आहे. कोरोना संकटामुळे 25 मार्चपासून पीएमपीची बस सेवा ठप्प आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 125 बस मार्गावर धावत आहे.
लॉकडाऊनपूर्वी मिळणाऱ्या सुमारे दीड कोटी रुपयांच्या उत्पनावर पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे पीएमपी ची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत. सुमारे पाच हजार कर्मचारी दोन्ही पालिकांकडे वर्ग केले आहेत. ही स्थिती सुधारण्यासाठी बस सेवा सुरू करणे आणि दोन्ही पालिकांकडून आर्थिक मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी शुक्रवारी अजित पवार यांची भेट घेतली. बैठकीत पवार यांनी बस मार्गावर येण्यासाठी तत्वतः मान्यता दिल्याचे समजते. दोन्ही महापालिका आयुक्त व जगताप यांच्या बैठकीनंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. जगताप यांनीही माध्यमांशी बोलताना याला दुजोरा दिला आहे. मार्ग व बस संख्या तसेच याबाबतची नियमावली अंतिम केली जाईल. गणेशोत्सवाच्या एक -दोन दिवस आधी किंवा गणेशोत्सव मध्ये बस धावण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पीएमपी कडून प्रवाशांची अधिक मार्ग असलेले 30 मार्ग निवडले जाण्याची शक्यता आहे. हे मार्ग वाढुही शकतात. मात्र कोरोनाची भीती कायम असल्याने केवळ ताफ्यातील 25 टक्के म्हणजे जवळपास 450 बस मार्गावर आणण्याची प्रशासनाची तयारी आहे. याबाबत जगताप आणि बैठकही घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ----------------- पुणे व पिंपरी चिंचवड मधील बहुतेक सर्व दुकाने, मॉल, कार्यालये सुरू झाली आहेत. यातील अनेक कर्मचारी पीएमपी प्रवास करायचे. पण सध्या बस बंद असल्याने त्यांचे हाल होत आहेत. सेवा आणखी काही काळ बंद राहिल्यास हे प्रवासी दुरावण्याची भीती आहे.
----------------
जेष्ठ नागरिकांचे काय?
सध्या अत्यावश्यक सेवेच्या बस, रिक्षा, कॅब मध्ये जेष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील मुलांना प्रवास करण्यास बंदी आहे. पण अनेक जेष्ठ नागरिकांना विविध ठिकाणी कामानिमित्त बाहेर पडावे लागते. त्यांना बस मध्ये प्रवेश देण्याची मागणी केली जात आहे. ----------------- दोन्ही पालिका आयुक्तांशी बोलणे झाले आहे. बस सेवा 22 तारखेला किंवा त्यापूर्वी सुरू करण्याबाबतचा निर्णय मंगळवारी घेतला जाऊ शकतो.- राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी