पिंपरी : जानेवारीअखेरपर्यंत ८० टक्के बस मार्गावर धावतील. बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दैनंदिन उत्पन्नातील ६ टक्के हिस्सा बाजूला ठेवणार आहे. चांगल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि कामचुकारांना शिक्षा असे धोरण अवलंबणार असल्याची भूमिका पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत श्रीकर परदेशी यांच्या उपस्थितीत पीएमपीबाबत बैठक झाली. बैठकीस पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, आयुक्त कुणाल कुमार, पुणे परिवहन प्रादेशिक कार्यालयाचे अधिकारी जितेंद्र पाटील, पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. परदेशी यांनी महापालिका पदाधिकारी व संचालक मंडळाबरोबर पीएमपी कारभारासंदर्भात चर्चा केली. परदेशी म्हणाले, ‘‘पीएमपीच्या नादुरुस्त बसची संख्या अधिक आहे. ब्रेकडाऊन बसचे प्रमाण कमी करून अधिकाधिक बस मार्गावर धावतील असा प्रयत्न आहे. बसगाड्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती होणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्पन्नातील काही हिस्सा वेगळा काढला जाणार आहे. दहा किंवा अधिक वर्षे झालेल्या ७ लाख किलोमीटर चालविलेल्या बसगाड्या बाजूला काढण्यात येणार आहेत. डेपो व्यवस्थापकांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यांच्याकडूनआढावा घेतला जाईल. पीएमपीमध्ये बायोमेट्रिक पद्धत अवलंबण्यात येणार आहे. पीएमपीला एका दिवसात यापूर्वी १ कोटी ५१ लाखापर्यंत उत्पन्न मिळाल्याची नोंद आहे. डबघाईला आलेल्या पीएमपीचा पदभार परदेशी यांनी स्वीकारल्यानंतर मंगळवारी १ कोटी ७० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पीएमपीच्या सेवेतही सुधारणा घडून येईल, अशी आशा पीएमपीच्या संचालकांनी या वेळी व्यक्त केली.दरम्यान, परदेशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर ते प्रथमच महापालिकेत आले होते. त्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. (प्रतिनिधी)
पीएमपी सक्षम करणार
By admin | Published: December 25, 2014 5:00 AM