पुणे : सातत्याने ताेट्यात असणारी पीएमपी आता बीआरटी बसथांब्यांच्या माध्यमातून आपले उत्पन्न वाढविणार आहे. शहरातील बीआरटी बसथांब्यांवर जाहीरातीसाठी हाेर्डिंग उभारण्याचे काम सुरु असून या माध्यमातून पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यात येणार आहे.
पीएमपी अनेक कारणांनी ताेट्यात आहे. त्यातच सातत्याने बसेस मार्गावर बंद पडत असल्याने नागरिकांना मनस्तापाला सामाेरे जावे लागत आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने शहरात खासगी वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. शहरात संगमवाडी ते विश्रांतवाडी, औंध ते रावेत, नाशिक फाटा ते वाकड, निगडी ते दापोडी हे बीआरटी मार्ग आहेत. या मार्गांवर असणाऱ्या बसथांब्यांवर आता हाेर्डिंग्ज उभारण्यात येणार आहेत. पीएमपीला जाहिरातींसह विविध मार्गाने मिळणारा महसूल कमी झाला आहे. त्यामुळे संचालक मंडळानेही उत्पन्नाचे विविध स्त्रोत निर्माण करण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. यापार्श्वभुमीवर प्रशासनाने बीआरटी मार्गांवरील बसथांब्याच्या शेडवर जाहिरात होर्डिंग उभारण्यासाठी मान्यता दिली आहे.
याबाबत बाेलताना पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर म्हणाले, शहरातील बीआरटी मार्गांवर हाेर्डिंग्ज उभारण्यात येत आहेत. या माध्यमातून पीएमपीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकाेनातून सर्व उपाययाेजना केली असल्याने या हाेर्डिंग्जमुळे कुठलाही धाेका निर्माण हाेणार नाही.