पुणे: माजी सैनिकांच्या पत्नी व विधवांना आधार देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) या महिलांच्या बचत गटांकडून सुमारे ४० बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव बुधवारी झालेल्या पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक व पीएमपीचे संचालक सिध्दार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे उपस्थित होते. पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात दोन लाखांपेक्षा जास्त माजी सैनिक असून, यांपैकी ३० टक्के माजी सैनिकांच्या विधवा आहेत. या महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या मुळ उद्देशाने बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या महिला बचत गटांच्या ४० बसेस पीएमपीएमएल भाडेतत्त्वावर घेईल असा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. यामुळे विधवा व माजी सैनिकांचे पुनर्वसन होण्यास हातभार लागेल व माजी सैनिकांना रोजगार निर्मिती होण्यासाठी देखील मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र व राज्य स्तरावर माजी सैनिकांसाठी असलेल्या कल्याण निधीतून महिला बचत गटांना या बस घेता येणार आहेत.माजी सैनिकांच्या पत्नी व विधवांच्या बचत गटाकडून घेण्यात येणा-या बसेस या निविदा प्रक्रियेतील सर्व अटी, शर्ती लागू करूनच घेण्यात येणार आहेत. पीएमपीएमएलच्या स्पेसिफिकेशन प्रमाणेच या बसेचा पुरवठा करण्यात येईल. या भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या बसेस मध्ये माजी सैनिक हे चालक म्हणून तर माजी सैनिकांच्या पत्नी अथवा विधवा या वाहक म्हणून कार्यरत असतील असे सिद्धार्थ शिरोळे यांनी यावेळी सांगितले.
माजी सैनिकांच्या पत्नी आणि विधवांकडून पीएमपी घेणार ४० बस भाडेतत्त्वावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 12:05 PM
महाराष्ट्रात दोन लाखांपेक्षा जास्त माजी सैनिक असून, यांपैकी ३० टक्के माजी सैनिकांच्या विधवा आहेत.
ठळक मुद्देमाजी सैनिक हे चालक म्हणून तर माजी सैनिकांच्या पत्नी अथवा विधवा वाहक म्हणून कार्यरत घेण्यात येणा-या बसेस या निविदा प्रक्रियेतील सर्व अटी, शर्ती लागू करूनच घेण्यात येणार