पुणे : पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाला सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या संचलन तुटीपोटी महानगरपालिकेच्या वतीने आता प्रत्येक महिन्यास हप्त्याने निधी देण्यात येणार आहे. ही तूट ६३ कोटी रुपयांची असून, ती पीएमपीला देण्यासाठी प्रत्येक महिन्याला ५ कोटी २५ लाख रुपये दिले जाणार आहेत, यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पीएमपीला पालिकेकडून दरमहा निधी मिळणार असून, संचलन तूट भरून काढण्या बरोबरच पीएमपीच्या सक्षमीकरणासाठीही वेळेत निधी उपलब्ध होणार आहे. चार महिन्यांपूर्वी पीएमपीचा अतिरिक्त पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी महापालिकेकडून वर्षाअखेरीस निधी न देता, तो दर महिन्यास हप्त्याने देण्याची मागणी केली होती. त्यानुसार स्थायी समितीनेही त्यास मान्यता दिली होती. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. पीएमपीमध्ये पुणे महापालिकेचा ६० टक्के, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ४० टक्के हिस्सा आहे. त्यामुळे या कंपनीत होणारा संचलन तुटीचा खर्च आणि इतर खरेदीवरील व्हॅटची रक्कम दोन्ही महापालिकांनी पीएमपीला देणे बंधनकारक असल्याचे आदेश फेबु्रवारी २०१४ मध्ये राज्य सरकारने महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार पीएमपीला २०१४-१५ या आर्थिक वर्षात झालेल्या तुटीपोटीतील ६० टक्के हिस्सा पुणे महापालिकेच्या वतीने पीएमपीला देण्यात येणार आहे. सुमारे ६३ कोटी रुपये पीएमपीला देण्याचा प्रस्ताव असून, ती सर्व रक्कम एकरकमी न देता, टप्प्या-टप्प्याने देण्याचा हा प्रस्ताव आहे.(प्रतिनिधी)तुटीपोटी पीएमपीला ६३ कोटी
तुटीपोटी पीएमपीला ६३ कोटी
By admin | Published: April 05, 2015 12:37 AM