पुणे : राजकीय पक्ष-संघटना तसेच कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा दबाव न जुमानता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीनंतर पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये पुन्हा वशिलेबाजी सुरू झाली आहे. बदली, पदोन्नती तसेच इतर कामांसाठी ‘पीएमपी’तील अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी तसेच मोबाईलवरून संभाषणे सुरू झाली आहेत. डॉ. परदेशी असताना त्यांच्या कर्तव्यनिष्ठ प्रतिमेमुळे या कामांसाठी मागील तीन महिने कुणीही फिरकत नसे. मात्र आता हा त्रास पुन्हा सुरू झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. परदेशी यांनी प्रशासनावर वचक निर्माण केला होता. मुळात डॉ. परदेशी यांची प्रतिमाच अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी अशी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी नगरसेवक, आमदार, मंत्री यांना न जुमानता अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. कोणतेही पद मिळाले तरी कामात पारदर्शकता ठेवून त्यांनी नियमानुसारच कामकाज केले. त्यांच्या पारदर्शी कारभारामुळे त्यांच्याकडे कुणीही बदल्या किंवा पदोन्नतीसाठी वशिले लावण्याचे धाडस करीत नसत. पीएमपीमध्ये त्यांनी आपल्या कामातून हा दरारा कायम ठेवला होता.
पीएमपीत वशिलेबाजी सुरू
By admin | Published: April 07, 2015 5:43 AM