पुणे : पीएमपीएमएलचे नवे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी कार्यभार हाती घेतल्यापासून नवे उपक्रम सुरु केले आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्नही सुरु झाले आहेत. तसेच त्यांनी सामान्य माणसाप्रमाणे प्रवास करून नागरिकांशी संवाद साधल्याचे निदर्शनास आले होते. अशातच सिंह यांच्या नेतृत्वाखाली पीएमपीएमएलने एक नवाच फंडा समोर आणला आहे. नागरिकांनी तक्रार नोंदवल्यास आणि ती योग्य असल्यास १०० रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती पीएमपीएमएलच्या अधिकृत ट्विटर वरून देण्यात आली आहे.
पीएमपीएमएल वतीने सांगण्यात आले आहे की, ड्युटीवर असताना चालक किंवा वाहक सर्व नियमांचे पालन करतील याची खात्री करण्यासाठी, आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्याकरिता आम्ही सर्व नागरिकांना आम्हाला पाठिंबा देण्याची विनंती करतो. कोणताही चालक किंवा वाहक ड्युटीवर मोबाईल फोन वापरताना, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवताना किंवा रुट बोर्ड नसलेली बस चालवताना आढळल्यास पीएमपीएमएल कडे ईमेल: complaints@pmpml.org किंवा व्हाट्सअँप : 9881495589 द्वारे त्वरित तक्रार करू शकता. फोटो / व्हिडिओ, बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, तारीख आणि वेळ या सर्व तपशीलांसह तक्रार नोंदवण्याची विनंती. तक्रार योग्य असल्यास नागरिकांना ₹ १०० बक्षीस स्वरूपात देण्यात येईल. तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर ₹ १००० चा दंड लादण्यात येईल.
आता नागरिकांनाही करता येणार सूचना
बससेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी, प्रवाशी सेवा लोकाभिमुख होण्यासाठी व प्रवाशांचे मोलाचे मार्गदर्शन मिळवण्याकरीता प्रत्येक आगारामध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी दुपारी ०३:०० ते ०५:०० या वेळेत "प्रवासी दिन" आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ज्या प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन कामामुळे किंवा वेळेअभावी आगारात येऊन तक्रार किंवा सूचना करण्यास येता येत नसेल त्या प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या मुख्य बस स्थानकांवर व पास केंद्रांवर अर्ज द्यावेत. तरी पीएमपीएमएलमार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या प्रवासी दिन या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.