पुणे : पीएमपीएमएलने एक माेठा निर्णय घेतला असून पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देण्यात येणार आहे. पीएमपीचे जवळपास 9 हजार कर्मचारी असून ते सर्व कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार देणार आहेत.
पुलवामाचा हल्ला हा सुरक्षा यंत्रणांवरील सर्वात माेठा दहशतवादी हल्ला हाेता. या हल्ल्यात सीआरपीएफच्या चाळीसहून अधिक जवानांना आपले प्राण गमवावे लागले हाेते. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरुन गेला हाेता. यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय पीएमपीकडून घेण्यात आला. या निर्णयाला सर्वच कर्मचाऱ्यांनी पाठींबा दर्शवला असून, सर्व कामगार संघटनांनी सुद्धा हा प्रस्ताव मान्य केला आहे. येत्या काही दिवसात ही रक्कम पुलवामा हल्ल्यातील कुटुंबियांना देण्यात येणार आहे.
याबाबत बाेलताना पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे म्हणाल्या, आपले जवान सीमेवर उभे असतात त्यामुळे आपण देशात सुरक्षित आहाेत. पुलवामाचा हल्ला हा माेठा दहशतवादी हल्ला हाेता. या हल्ल्यात आपल्या सीआरपीएफच्या जवानांना प्राण गमवावे लागले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांना छाेटीशी मदत करण्याचा निर्णय पीएमपीकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार पीएमपीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. याला सर्व कर्मचारी संघटनांनी देखील पाठींबा दर्शवला आहे.