पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने (पीएमपीएमएल) ‘बस डे’निमित्त तसेच १८ तारखेचे औचित्य साधत सर्वच मार्गांवर तब्बल १८०० बसेस धावणार आहेत. आजच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रत्येक बसमधील प्रवाशांकडून विशेष कुपन भरून घेतले जाईल. त्याचा लकी ड्रॉ काढण्यात येईल. त्यातील प्रथम विजेत्याला संपूर्ण वर्षभर सर्व मार्गांवर फुकट प्रवास करता येईल. त्यासाठी त्यांना फ्री पास देण्यात येणार आहे, तर द्वितीय विजेत्याला सहा महिने तर तृतीय विजेत्याला तीन महिन्यांसाठी फ्री पास मिळेल. या उपक्रमाची सुरुवात घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्र येथून होईल, अशी माहिती कामगार आणि जनता संपर्क अधिकारी एस. एस. घाटे यांनी दिली.
पीएमपीएमएलच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त महामंडळाकडून सोमवारी (दि.१८) ‘बस डे’ निमित्त या महत्त्वपूर्ण उपक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बस डे’ दिवशी पीएमपीएमएलच्या विविध बससेवांचा लाभ घेणाऱ्या सर्व प्रवाशांकरिता ‘लकी ड्रॉ’चे आयोजन केले असून, त्या ‘लकी ड्रॉ’मधील ३ विजेत्या प्रवाशांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे दिली जाणार आहेत.
१४ आगारांतून उत्तेजनार्थ १४ विजेत्यांना ३ महिन्यांकरिता सर्व मार्गांवर प्रवास करण्याकरिता मोफत पास दिले जाणार आहेत. ‘बस डे’निमित्त पीएमपीएमएलमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधांची माहिती होण्याच्या दृष्टीने प्रत्येक बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशास माहिती पत्रक देणार आहे. त्यात लकी कुपन असणार आहे. प्रवाशांनी कुपनमध्ये स्वतःचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर व पीएमपीएमएल सेवेबाबतचा अभिप्राय नमूद करावयाचा आहे.
कुपन प्रत्येक बस व बसस्थानकामध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये जमा करावयाचे आहे. ‘लकी ड्रॉ’ची सोडत दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (दि. १९) पीएमपीएमएलच्या वर्धापन दिनानिमित्त घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. ‘लकी ड्रॉ’मधील विजेत्या प्रवाशांना त्यांच्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून माहिती दिली जाणार आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा व सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे यांच्या हस्ते पास वितरित केले जाणार आहेत.