पुणे: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत ये-जा करण्याकरिता ‘पीएमपी’कडून मेट्रो फिडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. यामधून महिन्याभरातच पीएमपीएल मालामाल झाली आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १६ मार्गांवर ‘फिडर’ सेवा सुरू असून, या मार्गावरून पीएमपीएलला ४२ लाख ६५ हजार २९४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
स्वारगेट मेट्रो स्थानकपासून ऑक्टोबरपासून प्रवाशांसाठी मेट्रो फिडर सेवा सुरू करण्यात आली आहे. घरातून मेट्रो स्थानक आणि स्थानकापासून कामाच्या ठिकाणापर्यंत प्रवाशांना तत्काळ सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पीएमपीकडून पुणे शहरात ११ मेट्रो स्थानकापासून फिडर सेवा सुरू करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमध्ये ५ स्थानकांपासून, अशा एकूण १६ स्थानकांपासून ही सेवा सुरू आहे. यामध्ये गेल्या महिनाभरात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात ३ लाख ६७ हजार ३६७ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामधून ४२ लाख ६५ हजार २९४ रुपयांचे उत्पन्न पीएमपीला प्राप्त झाले आहे.
ऑक्टोबर महिन्याची फिडर प्रवासी संख्या - ३ लाख ६७ हजार ३३७ रुपयेफिडर सेवेतून उत्पन्न - ४२ लाख ६५ हजार २९४ रुपये
या स्थानकावर आहे मेट्रो फिडर सेवा
स्वारगेट मेट्रो स्टेशन ते स्वारगेट मेट्रो स्टेशन वर्तुळ, शिवाजीनगर मेट्रो स्टेशन ते नरेगाव, धनकवडी ते स्वारगेट मेट्रो स्टेशन भारती, विद्यापीठ स्वारगेट मेट्रो स्टेशन, राजस सोसायटी ते स्वारगेट मेट्रो स्टेशन, वनाज कंपनी मेट्रो स्टेशन ते वनाज कंपनी मेट्रो स्टेशन, गणपती माता ते डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन ते हडपसर, रामवाडी मेट्रो स्टेशन ते इंटरनॅशनल टेक पार्क खराडी, येरवडा मेट्रो स्टेशन ते लोहगाव विमानतळ. सेक्टर क्र. १२ पीएम आवास योजना भोसरी ते नाशिक फाटा मेट्रो स्टेशन, दिघी ते पिंपरी चौक मेट्रो स्टेशन पिंपरी मेट्रो स्टेशन ते मुक्ताई चौक, पिंपरी मेट्रो स्टेशन ते काळेवाडी फाटा, भक्ती शक्ती ते नाशिक फाटा मेट्रो स्टेशन.
फिडर सेवा कार्यक्षम करण्याची गरज
मेट्रो स्थानकांतर्गत सुटणाऱ्या बसेस आणि बस थांब्यांबाबत माहितीचा अभाव असल्याने फीडर सेवेच्या वेळापत्रकाबाबत मेट्रो प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे. माहितीच्या कमतरतेमुळे, बरेच प्रवासी रिक्षा किंवा ओला आणि उबेरसारख्या खासगी सेवांसारख्या पर्यायी वाहतुकीचा पर्याय निवडतात. प्रत्येक मेट्रो स्थानकावर पीएमपीएल मार्ग आणि सुटणाऱ्या बसेसचा तपशील स्पष्टपणे प्रदर्शित करावा, तसेच फिडर बसमध्ये वाढ करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
गेल्या महिन्यातच स्वारगेट स्थानकापासून ५ मार्गावर फिडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मेट्रो फिडरची प्रवासी संख्या अधिक वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. -सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक