पुणे : पीएमपी (PMPML) आता खऱ्या अर्थाने सुसाट झाली आहे. एका दिवसांत ९ लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे. एका दिवसाचे उत्पन्न दीडकोटीवर पोहोचले आहे. कोविडपूर्वीची २४ फेब्रुवारी २०२० रोजी पीएमपीची हीच स्थिती होती. कोविड काळात पीएमपीची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेपुरतीच मर्यादित होती. निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता आल्यानंतर पीएमपीची बससेवा टप्प्याटप्प्याने सुरू झाली.
बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत असताना ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्याने पुन्हा लावण्यात आले. शाळा, कॉलेज बंद करण्यात आले, तसेच निर्बंधही कडक करण्यात आले. त्यामुळे बस संचालनात पुन्हा कपात करावी लागली. लॉकडाऊनपूर्वी असलेली दैनंदिन प्रवासी संख्या व दैनंदिन उत्पन्न मिळवण्यासाठी पीएमपीएमएल प्रयत्नशील आहे.
लॉकडाऊनपूर्वी पीएमपीचे १ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर म्हणजेच जवळपास २ वर्षांनी पीएमपीची दैनंदिन प्रवासी संख्या ९ लाखांपर्यंत पोहोचली असून, १४ फेब्रुवारी २०२२ रोजी एकूण १,५४७ इतक्या बसेस संचालनात होत्या. त्या दिवशी पीएमपीला १ कोटी ५० लाख २२ हजार ३२६ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.