पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने जास्त उत्पन्न देणाऱ्या २४ मार्गांवर वाढवलेल्या ५० फेऱ्या या शहरातील असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये नवीन चार मार्ग सुरू करण्यात आले आहेत. तर, कमी उत्पन्नाच्या २५ मार्गांवरील कमी केलेल्या बहुतांश फेऱ्या या ग्रामीण भागातील आहेत. ‘पीएमपी’देखील आता अधिक उत्पन्न देणाऱ्या मार्गावरच धावत असल्याचे दिसून येत आहे.
पीएमपीने वाहकांकडून सर्वेक्षण केल्यानंतर शहरातील २५ मार्गांवरील ४० फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी १७ मार्गांवरील सर्व फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश मार्ग हे ग्रामीण भागातील असल्याचे दिसून आले आहे. तर, जास्त उत्पन्न देणाऱ्या २४ मार्गांवर ५० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मनपा येथून रावेत, भोसरी, निगडी, तळेगाव ढमढेरे, खराडी येथे बस सुरू करण्यात आल्या आहेत. तर, स्वारगेट येथून विश्रांतवाडी, नऱ्हेगाव, नांदेड सिटी या मार्गावर फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. भेकराईनगर ते एनडीए १० नंबर गेट मार्गावर चार फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत, तर डेक्कन येथून सिंहगडला जाण्यासाठी एक फेरी वाढविण्यात आली आहे. स्वारगेट नऱ्हेगावदरम्यान पाच फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
नवीन सुरू केलेले मार्ग
हडपसर ते वाघोली (ई-ऑन आयटी पार्कमार्गे)
कात्रज ते पुणे स्टेशन (गंगाधाममार्गे)
मनपा ते खराडी (ई-ऑन आयटी पार्कमार्गे)
स्वारगेट ते नांदेड सिटी