लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आपत्तीत महापालिकेच्या आरोग्य विभागाला कोरोना प्रतिबंधात्मक कामांमध्ये मदत करण्यासाठी, महापालिकेच्या मागणीनुसार पीएमपीएमएलने (पुणे महानगर परिवहन महामंडळाने) आरोग्य विभागाच्या मदतीसाठी पाठविलेल्या आपल्या सर्वच सेवकांना पुन्हा मूळ कामावर बोलावून घेतले आहे़ यामुळे मनुष्यबळाअभावी सर्वांत मोठा फटका हा आरोग्य विभागाकडून होणाऱ्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामावर होणार आहे.
१४ सप्टेंबरपासून सर्व सेवकांनी आपापल्या कामाच्या ठिकाणी रुजू व्हावे, अन्यथा संबंधितांवर प्रशासकीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल़, असा इशाराही पीएमपीएमएलच्या स्वारगेट आगार येथे नोटीसव्दारे सूचना फलकावर लावण्यात आला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या १२० टीममध्ये पीएमपीएमएलचे ४९० सेवक कोरोना आपत्तीच्या पहिल्या लाटेपासून कार्यरत आहेत़ सध्या पीएमपीएमएलची बससेवा पूर्णत: पूर्ववत झाल्याने व कोरोना आपत्तीचा प्रभावही कमी झाल्याने या सर्व सेवकांना पुन्हा मूळ कामावर हजर होण्याची सूचना करण्यात आली आहे़ यामध्ये वाहनचालक, वाहक, कार्यालयीन सेवक वर्ग यांचा समावेश आहे़
आरोग्य विभागामध्ये सध्या पीएमपीएमएलचे ४९० सेवक विविध ठिकाणी म्हणजे लसीकरण केंद्र, स्वॅब सेंटर, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोरोना वॉररूम आदी ठिकाणी कार्यरत होते़ तर यापैकी बहुतांशी सेवक हे सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करता कार्यरत आहेत़
--------------------
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम आणखी कमकुवत
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून काम केले जाते. आधीच या कामासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने हे काम पाहिजे त्या प्रमाणात समाधानकारक होत नाही़ याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या कोरोना आढावा बैठकीतही नाराजी व्यक्त करून, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम आणखी प्रभावीपणे करण्याबाबत महापालिकेच्या सूचना करण्यात आल्या होत्या़ मात्र, मनुष्यबळाअभावी हे काम अधिकच कमकुवत होणार आहे़