पुणे : शहरातून हडपसररेल्वे टर्मिनल येथे जाण्यासाठी स्वारगेट आणि डेक्कन येथून पीएमपी बस सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या बससेवेमुळे हडपसररेल्वे स्टेशनला जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. यामुळे रिक्षा चालकांकडून होणारी लूट थांबणार आहे.
हडपसर टर्मिनलवर सध्या केवळ हडपसर-हैदराबाद ही एकमेव रेल्वे सुरू आहे. ही रेल्वे मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुटते. याच दिवशी हैदराबाद येथून सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी हडपसर येथे येते. प्रवाशांच्या सोयीसाठी या तीन दिवशी स्वारगेट आणि डेक्कन येथून बस सोडण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ता अरुंद असल्याने मिडी बस सोडण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता हडपसर येथून या दोन्ही बस सुटतील. स्वारगेटला १२ वाजता तर डेक्कन येथे सव्वाबाराच्या सुमारास या बस पोहोचतील, तसेच स्वारगेट येथून दुपारी २ वाजता बस सुटेल, तर डेक्कनहून दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी पीएमपी सुटेल. हडपसर येथे दुपारी तीनच्या सुमारास या बस पोहोचतील, अशी माहिती पीएमपी प्रशासनातर्फे देण्यात आली.