राजानंद मोरे
पुणे : ठेकेदारांकडून पुरेशा बस मिळत नसल्याने पीएमपी प्रशासनाकडून बीआरटी मार्गावर कधीही न धावलेल्या जुन्या बसेसला नवा मुलामा दिला जात आहे. या बसेसचे वर्षानुवर्षे बंद असलेले दरवाजे, तसेच इतर यंत्रणा दुरुस्त करून मार्गावर सोडण्याचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, वापराअभावी दरवाजे उघडझाप करणारी संपूर्ण यंत्रणाच निकामी झाल्याने अधिकारी व कर्मचाºयांची डोकेदुखी वाढली आहे. मार्गावर आलेल्या अनेक बसेसचे दरवाजे सातत्याने नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.
शहरात स्वारगेट ते कात्रजदरम्यान २०१० मध्ये पहिला बीआरटी मार्ग सुरू झाला. त्याच कालावधीत या मार्गासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत (जेएनएनयुआरएम) ३०० हून अधिक बस मिळाल्या होत्या. या बसेसला दोन्ही बाजूला दरवाजे आहेत. पण हा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आल्याने बीआरटी मार्गासाठी आवश्यक बसस्थानकेच उभारण्यात आली नाहीत. या मार्गावर तेवढ्या बसची वारंवारिताही नव्हती. त्यामुळे या बसेसच्या स्वयंचलित दरवाजांचा वापरच झाला नाही. त्यातील २०० बस एका खासगी टॅÑव्हल कंपनीला चालविण्यास देण्यात आल्या. मागील ५ वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर दोन्ही बाजूला दरवाजे असलेल्या बसेस घेण्यात आल्या. त्यानंतर पुढील तीन वर्षांत संगमवाडी ते विश्रांतवाडी हा बीआरटी मार्ग सुरू करण्यात आला. ‘इंटिलिजन्ट ट्रान्स्पोर्टेशन मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) चा वापर करून हा मार्ग, बसस्थानके सुसज्ज करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात बसेसच्या डाव्या बाजूकडील दरवाजांचा वापर होऊ लागला. पण या मार्गावर भाडेतत्त्वावरील बस सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानंतर दापोडी-निगडी मार्ग सुरू होईपर्यंत आधीच्या चारही मार्गांवर भाडेतत्त्वावरील बसेस सोडण्यात येत होत्या. परिणामी, पीएमपीच्या मालकीच्या बसेसचा वापर झाला नाही. हा मार्ग सुरू होईपर्यंत मागील आठ वर्षांत एकदाही बसच्या डाव्या बाजूचे दरवाजे उघडले गेले नाहीत.पीएमपी मालकीच्या डाव्या बाजूकडे दरवाजे असलेल्या बसेसचा कधी वापरच न झाल्याने या दरवाजाच्या तांत्रिक बाबींबाबत कर्मचाºयांना काहीच माहिती नाही. भाडेतत्त्वावरील बसेसचे देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी त्यांचीच आहे. त्यामुळे पीएमपी कर्मचाºयांशी त्याचा संबंध आला नाही.आता अचानक दरवाजे दुरुस्तीचे काम आल्याने ‘पीएमपी’ बाहेरच्या तंत्रज्ञांचा आधारघ्यावा लागत आहे. सध्या ३ ते ४ जण हे काम करीत आहेत. त्यांच्याकडून पीएमपीतील ३ ते ४ कर्मचाºयांना याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे समजते.न्यायालयाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने घाई केल्याने ‘पीएमपी’ला जुन्या बसेसचा आधार घ्यावा लागला आहे. त्यामुळे या मार्गावर बस कमी पडू नयेत, म्हणून तातडीने जुन्या बसेसमधील यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी धडपड सुरू झाली. पण आतापर्यंत कधीच वापर न झाल्याने काही बसेसच्या दरवाजांची यंत्रणा निकामी झाली आहे. सुरुवातीला त्याचे सुटे भाग मिळण्यासही अडचणी आल्या, तर काही बसेसचे दरवाजे दुरुस्त करून या बस मार्गावर सोडण्यात येत आहेत. अनेक वर्षे बंद असल्याने त्यात सातत्याने तांत्रिक बिघाड निर्माण होत आहेत. आतापर्यंत २०० हून अधिक बसेसचे दरवाजे दुरुस्त करण्यात आले आहेत. सध्या ६० ते ७० बसेसचे काम सुरू आहे, असे अधिकाºयांनी सांगितले.