पुणे : पीएमपीएलमध्ये महिला कर्मचाऱ्याची संख्या वाढत आहे. या महिलांना स्वच्छतागृहाची व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येक डेपोत महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृह, विश्राम कक्ष, तक्रार निवारण समिती या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पीएमपीएलमधील महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आयोगाकडे दाखल तक्रारी, निवेदनाच्या संदर्भात चाकणकर यांनी सोमवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. पीएमपीएलची तक्रार निवारण समिती, तक्रार दाखल करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीची स्वतंत्र व्यवस्था, तक्रारींचा निपटारा, डेपोत सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, अशा सूचना केल्या. त्यावर प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून महिनाभरात त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे चाकणकर यांनी सांगितले. ओमान-दुबईमध्ये पुणे जिल्ह्यातील ८५ महिला अडकल्या आहेत. त्यांना नोकरीचे आमिष दाखवून तेथे नेण्यात आले आहे. संबंधित महिलांचे मोबाइल क्रमांकही बंद आहेत. यासंदर्भात आयोगाने भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असून, त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
पीडितेच्या नावाचा उल्लेख टाळा
विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदारांकडून पीडित महिला, मृत महिलेच्या नावाचा उल्लेख केला जात आहे. तसेच समाज माध्यमांवरही नावांचा उल्लेख केला जातो. हे कृत्य कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे आमदारांना यासंदर्भात माहिती द्यावी, असे पत्र राज्याच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.