पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मध्ये बीआरटी सेल नावापुरताच असल्याचे समोर आले आहे. या सेलला स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारीही नाहीत. इतर बसेसचे नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच बीआरटी बस वाहतुकीचेही नियोजन करावे लागत आहे. त्यामुळे बीआरटी बसेसच्या नियोजन व कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.शहरात स्वारगेट ते सातारा व स्वारगेट ते हडपसर हे दोन बीआरटी मार्ग आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या ‘पीएमपी’ची सेवा प्रवाशांना अधिक जलदगतीने मिळावी, तसेच अधिकाधिक पुणेकरांनी बसने प्रवास करावा यासाठी बीआरटीचा हट्ट करण्यात आला. त्याचप्रमाणे पीएमपीमध्ये बीआरटीसाठी स्वतंत्र सेलही निर्माण करण्यात आला. मात्र हा सेलही आता बीआरटी मार्गाप्रमाणेच नावापुरता उरला आहे. दोन्ही बीआरटी मार्गांची पुरती वाट लागलेली असल्याने प्रवाशांना या मार्गांचा काहीही फायदा होताना दिसत नाही.बीआरटी सेलमध्ये सुरुवातीला काही वर्षे पूर्णवेळ अधिकारी कार्यरत होते. मात्र, सध्या पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मयूरा शिंदीकर यांच्याकडेच या सेलचा भार सोपविण्यात आला आहे. तर वाहतूक नियंत्रक विभागातील अधिकारी व कर्मचारी त्यांच्या दिमतीला आहेत. या विभागावर या दोन मार्गांव्यतिरिक्त शहरातील अन्य मार्गांवरील वाहतूक नियोजनाची जबाबदारी आहे. त्याचा बोजा खूप मोठा आहे. त्यामुळे नियोजनात ढिसाळपणा आढळून येतो. ‘शहरातील काही रस्त्यांवर बीआरटी मार्ग सुरू करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी बसवाहतुकीचे नियोजनही महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र स्वतंत्र सेल नसल्याने इतर बसेसप्रमाणेच बीआरटी बसेसच्या नियोजनाचा बोजा आपोआपच या विभागावर येणार आहे. त्यामुळे पीएमपीमध्ये स्वतंत्र बीआरटी सेल असणे आवश्यक आहे,’ असे युवक काँग्रेसचे पदाधिकारी ऋषी बालगुडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पीएमपीचा बीआरटी सेल नावालाच !
By admin | Published: December 07, 2014 11:48 PM