पुणे : उत्पन्न वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) प्रोत्साहन भत्ता योजनेने हात दिला आहे. वाहक व चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे पीएमपीचे तीन मार्गांवरील उत्पन्न वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे आता ही योजना आणखी सात मार्गांवर सुरू केली जाणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. मागील काही महिन्यांमध्ये पीएमपीचे उत्पन्न तसेच प्रवासी संख्येत घट झाल्याचे चित्र आहे. त्यादृष्टीने उत्पन्न वाढीसाठी पीएमपी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये प्रशासनाने पहिल्या टप्प्यात कात्रज ते पुणे स्टेशन, कात्रज ते शिवाजीनगर व स्वारगेट ते धायरी या तीन बसमार्गांवर सकाळ व दुपार सत्रामध्ये चालक व वाहकांसाठी प्रायोगिक तत्वावर प्रोत्साहन भत्ता योजना सुरू केली. दि. १५ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या योजनेमध्ये चालक व वाहकांना निश्चित उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पन्न आणल्यास वाढीव रकमेवर प्रत्येकी १० टक्के भत्ता दिला जातो. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. त्यासाठी दि.१५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीतील उत्पन्न आणि दि. १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीतील उत्पन्नाची तुलना करण्यात आली आहे. त्यानुसार कात्रज ते पुणे स्टेशन मार्गावरील उत्पन्न सुमारे ४० हजार, कात्रत ते शिवाजीनगर मार्गावरील उत्पन्न सुमारे ६० हजार तर स्वारगेट ते धायरी मार्गावरील उत्पन्न सुमारे १३ हजारांनी वाढले आहे. दैनंदिन उत्पन्नामध्ये तिनही मार्गांवर ७ हजार रुपयांनी वाढ झाली. या सकारात्मक वाढीमुळे प्रशासनाने आणखी सात मार्गांवर ही योजना लागु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. २० डिसेंबरपासून खंडोजीबाबा चौक ते एसएनडीटी कॉलेज, पाटील इस्टेट ते दापोडी, सिमला आॅफिस ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, येरवडा ते वाघोली, डेक्कन कॉलेज ते विश्रांतवाडी, महात्मा गांधी बसस्थानक ते हडपसर, भोसरी ते चाकण व आळंदी या मार्गांवर अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.---------------प्रोत्साहन भत्ता सुरू असलेले मार्ग उत्पन्न -मार्ग दि. १५ ते ३० ऑक्टोबर दि. १५ ते ३० नोव्हेंबर कात्रज ते पुणे स्टेशन १,२०,३५,९६६ १,६०,२३,६५०कात्रज ते शिवाजीनगर २,८६,८८,४६७ ३,४६,७३,६६८स्वारगेट ते धायरी ६३,०४,३७६ ७६,३८,७५३------------------------------------------------------एकुण ४,७०,२८,८०९ ५,८३,३६,०७१-------------------------------------------------------प्रतिदिन उत्पन्न २९,३९,३०१ ३६,४६,००४
पीएमपी च्या ‘प्रोत्साहन’ योजनेने वाढले उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 10:00 PM
१५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या योजनेमध्ये चालक व वाहकांना निश्चित उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पन्न आणल्यास वाढीव रकमेवर प्रत्येकी १० टक्के भत्ता...
ठळक मुद्देआता '' प्रोत्साहन भत्ता योजना '' आणखी सात मार्गांवर सुरू केली जाणार मागील काही महिन्यांमध्ये पीएमपीचे उत्पन्न तसेच प्रवासी संख्येत घट झाल्याचे चित्र