धनकवडी - पीएमपीचे आजारपण सुरूच असून, सातारा रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार दुपारी अडीच वाजता सातारा रस्ता बीआरटी मार्गावर धनकवडीतील लोखंडी पादचारी पूल परिसरात आणि सोमवारी सकाळी साडे करा वाजता स्वामी विवेकानंद स्मारक, पद्मावती परिसरात दोन पीएमपी बस बंद पडून तासभर वाहतूककोंडी झाली. त्यामुळे एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला.अहिल्यादेवी चौक ते भारती विद्यापीठ हा चढण मार्ग आहे. या ठिकाणी पीएमपी बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. कात्रज आगार हाकेच्या अंतरावर असूनही बस ओढून मार्गातून बाजूला घेण्याची तत्परता दाखवली जात नसल्यामुळे तासभर वाहतूककोंडीत नागरिकांना अडकून पडावे लागले. असे प्रकार दिवसेंदिवस होत आहेत.उपाय सुरू; पण कोंडी कायमच1 पुणे-सातारा रस्ता पुनर्विकासाच्या कामाची नुकतीच महापौर मुक्ता टिळक यांनी पाहणी केली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ३१ मेपर्यंत काम पूर्ण करून रस्ता कोंडीमुक्त करा, अशा सूचना दिल्या होत्या. महापौरांच्या सूचनेप्रमाणे कामाला काही अंशी गती मिळाली; पण बस बंद पडण्याचे प्रमाण काही थांबलेले नाही. त्यामुळे कोंडीचा त्रास होतच आहे.बीआरटी मार्गातच बस तासभर उभी2 बस भोसरी डेपोची असल्यामुळे आणि ब्रेकडाऊन सेवा भोसरीची येणार असल्यामुळे तब्बल एक तास बस मार्गातच उभी होती. अरुंद रस्ता, बीआरटी मार्ग, सद्गुरू शंकरमहाराज उड्डाणपुलावरून आणि पुलाखालून येणारी वाहतूक रस्त्यामध्ये बंद पडलेल्या बसमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नव्या बस देता येत नसतील तर किमान अहिल्या देवी चौक ते भारती विद्यापीठ दरम्यान बंद पडणाऱ्या बस बाजूला घेण्याची स्वतंत्र व्यवस्था उन्हाळ्यात ठेवावी,अशी मागणी नागरिक करीत आहेत.४रविवारी दुपारी अडीच वाजता भोसरी ते कात्रज जाणारी बस बालाजीनगरच्या चढण मार्गात लोखंडी पुलाजवळ बंद पडली. बीआरटी पुनर्रचनेचे काम आणि अरुंद झालेल्या मार्गामुळे वाहनांना पुढे जाण्यास अडथळा होऊन एकच गोंधळ झाला.४रविवारी वाहतूककोंडीचा अनुभव ताजा असतानाच सोमवारी स्वामी विवेकानंद स्मारक, पद्मावती येथे एकाच वेळी बंद पडलेल्या दोन बस आणि ब्रेकडाऊनसाठी आलेली बस यामुळे पुन्हा वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. बीआरटी मार्गामध्ये पीएमपीएल बसची अचानक बंद पडण्याची मालिका चालूच असून, नागरिकांना मात्र उन्हात वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. ही मालिका थांबणार कधी, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे. एक तर बस वेळेत मिळत नाही आणि प्रवास करीत असताना मध्येच अचानक बंद पडल्यामुळे दुसरी बस करावी लागते. बसथांबा जवळ नसेल तर पुढे चालत जाऊन दुसºया बसचालकाला विनंती करावी लागते. पैसे देऊन त्रास सहन करावा लागतो.- नितीन काळे (प्रवासी )कात्रज आगारप्रमुख कुमार थोरवे यांना पीएमपी बंदबाबतविचारले असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.पुणे-सातारा रस्ता अर्बन डिझाइनचे काम चालू आहे. परंतु त्यांनी डिझाइन बनविताना बालाजीनगरमध्ये प्रत्यक्ष पाहणी करायला हवी होती. फुटपाथ, सायकल ट्रॅकमुळे रस्ता अरुंद झाला आहे. बस बंद पडली की अरुंद रस्त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होते. वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूककोंडी कमी व्हावी म्हणून उड्डाणपूल झाला, अर्बन डिझाइन झाले; पण वाहतूककोंडी काय कमी झाली नाही.- गिरीश कदम (वाहतूककोंडीमध्ये अडकलेला नागरिक )पुणे-सातारा मार्गाचे चालू असलेल्या पुनर्विकासाच्या कामामुळे रोज वाहतूककोंडी होत असते. संथगतीने चालणारी वाहतूक, कडक ऊन आणि बस मध्येच बंद पडल्यामुळे वेळेत कामावर जाता येत नाही. काम वेळेत न झाल्याने चिडचिड निर्माण होते. - योगेश डावळकर (प्रवासी)
पीएमपीचे आजारपण सुरूच , बस बंद पडल्याने प्रवासी उन्हात तासभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 3:40 AM