पुणे : महिला प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली तेजस्विनी बससेवा देशासाठी आदर्शवत ठरत आहे. सध्या एकुण ३८ बसमार्फत ही सेवा दिली जात असून मार्च अखेरपर्यंत आणखी २७ बसची त्यात भर पडणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खास महिलांसाठी बससेवा पुरविणारी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ही देशातील पहिलीच सार्वजनिक संस्था असल्याचे पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले.जागतिक महिला दिनी तेजस्विनी बससेवेला वर्ष पुर्ण होत आहे. मागील वर्षभरात या सेवेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मागील वर्षी जागतिक महिला दिनी ‘पीएमपी ’ ने तेजस्विनी ही बससेवा सुरू केली. त्यापूर्वीही पीएमपीकडून खास महिलांसाठी विशेष बससेवा होती. मात्र, बसचे प्रमाण कमी होते. राज्य शासनाने पुण्यासह अन्य काही शहरांमध्ये खास महिलांसाठी बस पुरविण्याचा निर्णय घेतला. या सेवेला तेजस्विनी नाव देण्यात आले. याअंतर्गत पीएमपी प्रशासनाने ही मागील वर्षी ही सेवा सुरू केली. मात्र, शासनाकडून बस वेळेत उपलब्ध न झाल्याने पीएमपीच्या ताफ्यात आलेल्या मिडी बसच्या माध्यमातून महिलांना बस उपलब्ध करून देण्यात आल्या. या सेवेला महिलांचा प्रतिसाद वाढत गेल्याने टप्प्याटप्याने बस, फेºया व मार्ग वाढविण्यात आले. आता दर महिन्याच्या ८ तारखेला ही सेवा मोफत दिली जाणार आहे.सध्या पुणे व पिंपरी चिंचवडमधील एकुण १४ मार्गांवर ही बससेवा सुरू आहे. एकुण ३८ बसच्या माध्यमातून दररोज या बससेवेच्या ४६४ फेºया होत आहेत. मागील महिन्यात शासनाच्या अत्याधुनिक सहा तेजस्विनी बस ताफ्यात दाखल झाल्या. त्याही बस आता संचलनात आणण्यात आल्या आहेत. मार्च २०१८ पासून आतापर्यत तेजस्विनी बसमधून प्रति महिना २ लाख ३३ हजार तर वर्षभरात २८ लाख महिलांनी प्रवास केला आहे. यातुन प्रति महिना ३४ लाख ३७ हजार तर ४ कोटी १२ लाख ५२ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळाले आहे. पीएमपीला प्रति किलोमीटर ३३ रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. सर्व बसमध्ये महिला वाहकांचीच नेमणुक करण्यात आली आहे. तिकीट तपासणीसाठी दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. टप्प्याटप्याने आणखी २७ बस पीएमपीला मिळणार आहेत. त्यामुळे तेजस्विनीच्या ताफ्यात आणखी भर पडणार आहे............देशात महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बससेवा अन्य कोणत्याही शहरात नाही. त्यामुळे ही सेवा पथदर्शी आहे. सध्या या सेवेला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना आहे. नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, नागरिकांकडून त्यांच्या भागात ही सेवा सुरू करण्याची सातत्याने मागणी होत आहे. मार्च अखेरपर्यंत आणखी २७ बस मिळाल्यानंतर मार्ग वाढविले जातील. - नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपुणे महानगर परिवहन महामंडळ
‘पीएमपी’ने खास महिलांसाठी सुरु केलेली ‘तेजस्विनी’ ठरतेय देशासाठी आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 11:39 AM
मागील वर्षी जागतिक महिला दिनी ‘पीएमपी ’ ने तेजस्विनी ही बससेवा सुरू केली. वर्षभरात या सेवेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
ठळक मुद्देएवढ्या मोठ्या प्रमाणावर खास महिलांसाठी बससेवा पुरविणारी पीएमपी देशातील पहिलीच सार्वजनिक संस्था मार्च २०१८ पासून आतापर्यत तेजस्विनी बसमधून प्रति महिना २ लाख ३३ हजार तर वर्षभरात २८ लाख महिलांनी केला प्रवासतिकीट तपासणीसाठी दामिनी पथकाची नियुक्ती