पुणे : अग्निशामक सेवेत ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले देवेंद्र प्रभाकर पोटफोडे यांना 'अग्निशामक दला'तील यशस्वी व बहुमोल कामगिरीबद्दल भारत सरकारकडून दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्यांची या क्षेत्रात अत्यंत अनुभवी, धाडसी व सकारात्मक अधिकारी म्हणून ओळख आहे. या अगोदर त्यांना २०११ मध्ये गुणवत्ता पूर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पदक मिळाले होते. यावर्षी विशेष म्हणजे अग्निशमन सेवेतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त करणारे पोटफोडे हे महाराष्ट्रातील एकमेव अग्निशमन अधिकारी आहेत.
देवेंद्र पोटफोडे यांनी भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या अग्निशमनातील अभियांत्रिकी पदविका सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहे. अग्निशमन क्षेत्रातील विविध यंत्रणा,उपकरणे व पद्धती यांचा सखोल अभ्यास करण्याकरता अमेरिका, जर्मनी,ऑस्ट्रिया ,जपान, फ्रान्स, इंग्लंड यासारख्या प्रगत राष्ट्रांच्या अग्निशमन सेवेसाठी त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत. तसेच २००६ ते २००८ या कालावधीत पोटफोडे यांनी पुणे शहराचे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून अनेक लोकोपयोगी व जनजागृतीपर उपाययोजना राबविल्या होत्या. एमआयडीसीच्या कोकण विभागाअंतर्गत अत्यंत धोकादायक ज्वलनशील ,रासायनिक उद्योगधंदे असणाऱ्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी विविध जबाबदाऱ्या त्यांनी उल्लेखनीयरित्या सांभाळल्या आहेत.
पुणे शहरामध्ये आयोजित केलेल्या काॅमनवेल्थ युथ गेम स्पर्धत सुमारे 71 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता . या स्पर्धेसाठी पंतप्रधान , राष्ट्रपती व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.या स्पर्धेच्या संपूर्ण अग्निसुरक्षेची जबाबदारी श्री पोटफोडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली होती.त. नुकत्याच सिरम इन्स्टिटयूटमधील आगीच्या दुर्घटनेत त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेतली गेली होती.