पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) राबवण्यात येणारा पुणे मेट्रो मार्ग ३ हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थितीत टाटा व सिमेन्स कंपनीस सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर मंत्रालय येथे प्रदान करण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी टी. यु. टी. पी. एल. (टाटा) समुहाचे संजय उबाळे व सिमेन्स कंपनीचे सुनील माथुर यांना प्रकल्प प्रदान पत्र सुपूर्द केले.
हिंजवडी येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळणारा प्रकल्प आहे. तसेच यातून प्रदूषण मुक्ती व वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. एकूण २३ कि.मी. लांबी असलेल्या ह्या प्रकल्पाची किंमत अंदाजे ८३१३ कोटी रुपये आहे. केंद्र शासनाच्या नवीन मेट्रो धोरणाअंतर्गत व खासगीकरणाच्या माध्यमातून प्रस्तुत प्रकल्पाचे संकल्पन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक साह्यातून व टाटा-सिमेन्स यांच्या खाजगी गुंतवणुकीतून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण होवून टाटा-सिमेन्स कंपनीस पुढील ३५ वर्ष मुदतीसाठी प्रकल्प चालवण्यासाठी संकल्पन करा, बांधा, गुंतवणूक करा, चालवा व हस्तांतरित करा या तत्वावर दिला आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन, अपर मुख्य सचिव (वित्त) यु. पी. एस. मदान, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
अशी असणार पीएमआरडीए मेट्रो
- मेट्रो मार्गावर एकूण २३ स्थानके
- प्रकल्पाची एकूण खर्च ८ हजार ३१३ कोटी रूपये
- त्यापैकी जागा भूसंपादनासाठी १८११ कोटी रूपये लागणार
- या मेट्रोचे संपूर्ण काम उन्नत मार्गावर संकल्पित (खांब उभारून जमिनीपासून वर)
- प्रत्यक्ष काम आॅक्टोबर २०१८ पासून सुरु होणार