हिंजवडी (पुणे) : आयटी परिसरात अखेर धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई सुरु करण्यात आली. बुधवारी (दि.१९) हिंजवडीतील गट नंबर १३२/१ येथील धोकादायक होर्डींगवर कारवाई करण्यात आली. यावेळी, चाळीस बाय चाळीस फूटाचे महाकाय, साधारणपणे १६०० चौ. फुटावरील होर्डींग निष्कासित करण्यात आले. तसेच, आज गुरुवारी (दि.२०) रोजी वाकड हिंजवडी रस्त्यावर दुपार नंतर पुन्हा धडक कारवाईला सुरुवात झाली असून, साठ बाय चाळीस फूट होर्डिंग काढण्याचे काम सुरु आहे.
आज दोन होर्डिग्जवर कारवाई प्रस्तावित असल्याचे समजते. दरम्यान, घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर धोकादायक होर्डिंग्जचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर मात्र, महापालिका आणि पीएमआरडीए प्रशासन खडबडून जागे झाले होते. आयटी परिसरात पीएमआरडीए विभाग ऍक्शन मोडवर आला असून, परिसरातील धोकादायक होर्डिंग्ज हटवीण्यास सुरुवात झाली आहे.
अनेक होर्डिंग मालकांनी परवानगी साठी पीएमआरडीएकडे अर्ज केले असून, त्याबाबत चाचपणी सुरु आहे. मात्र, ज्यांनी परवानगी घेतली नाही, टाळाटाळ करत आहेत अशा धोकादायक होर्डिंग्जवर धडक कारवाई सुरुच राहणार असून, कोणाचीही गय केली जाणार नाही असे पीएमआरडीएच्या आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी सचिन म्हस्के यांनी सांगितले.