पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) अर्थसंकल्पीय सभा सोमवारी मुंबई येथे आयोजित केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यग्र असल्याने ही सभा रविवारी सायंकाळी अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे पीएमआरडीएचा अर्थसंकल्प आणखी एकदा लांबणीवर पडला आहे. अर्थसंकल्पाला कधी मुहुर्त मिळेल, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री हे पीएमआरडीएचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्राधिकरण समितीची सभा घेऊन प्रशासनाकडून अर्थसंकल्प सादर केला जातो. मुख्यमंत्री हे पीएमआरडीएचे अध्यक्ष म्हणून अर्थसंकल्पाला मंजुरी देतात. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेऊन २९ मार्च रोजी अर्थसंकल्पीय सभेचे मुंबई येथे आयोजन केले हाेते. खासदार गिरिश बापट यांचे निधन झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे येथे आल्याने ही सभा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर ३० किंवा ३१ मार्च रोजी सभा होऊ अर्थसंकल्प सादर होणे आवश्यक होते. मात्र, मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नव्हती. दरम्यान, पीएमआरडीए प्रशासनाने मुख्यमंत्री शिंदे यांची वेळ मिळवून सोमवारी मुंबई येथे सभेचे आयोजन केले.
राजकीय अस्थिरतेचा परिणाम?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार पडणार, अशी चर्चा रंगली आहे. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे वक्त्यव्य केले. त्यामुळे राज्यात राजकीय स्थित्यंतरे होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्व राजकीय गुऱ्हाळामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांच्या पक्षातील आमदार आणि खासदारांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री व्यग्र असल्याने पीएमआरडीएची सोमवारची नियोजित सभा रद्द करण्यात आल्याचे दिसून येते.