विकासकामांवर परिणाम : लवकर जाहीर करण्याची शासनाकडे मागणी
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचा (पीएमआरडीए) विकास पुन्हा एकदा रखडला आहे. अडीच हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेला आणि पुणे शहर आणि परिसराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्तवाचा असलेला विकास आराखडा लवकर जाहीर होणे आवश्यक आहे. ३० एप्रिल २०२१ ला आराखडा जाहीर करण्याची अंतिम मुदत होती. मात्र, कोविडच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच राज्य शासनाने लवकर आराखडा जाहीर करावा, अशी मागणी देखील केली आहे.
पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. वास्तविक २०१७ साली विकास आराखडा तयार करण्याचा पीएमआरडीएचा मानस होता. मात्र सुरुवातीला लोकसभा निवडणूक आचारसंहिता, त्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता अन आता दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट आदी वेगवेगळ्या कारणामुळे वारंवार मुदतवाढ मिळत आहे. आतापर्यंत ३ ते ४ वेळा आराखड्याला मुदतवाढ मिळाली आहे. २०१७ नंतर पुढील दोन वर्षात कायद्यातील तरतुदीनुसार आराखडा पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, तत्पूर्वीच राज्य शासनाने पीएमआरडीएच्या बांधकाम नियमावलीला मान्यता दिली. त्यामुळे वारंवार मुदतवाढीनंतरही आराखड्याचे प्रारूपदेखील अद्याप तयार झाले नसल्याचे समोर आले आहे.
-----
समाविष्ट गावांचा विकास कोण करणार ?
पीएमअरडीएच्या हद्दीतून पुणे महापालिकेत २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, अंतिम आदेश शासनाने काढला नाही. त्यामुळे या गावांचा विकास कोणी करायचा याची अद्याप स्पष्टता आली नाही. पीएमआरडीएच्या विकास आराखड्यानुसार पुणे महापालिका २३ गावांचा विकास करणार की, स्वतंत्र स्वतःच्या आराखड्यानुसार विकास करणार हे राज्य शासनाच्या अंतिम आदेशानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
-----
पीएमआरडीएचे प्रकल्प पुण्याचे ‘ग्रोथ इंजिन’
हिंजवडी-शिवाजीनगर आणि शिवाजीनगर-लोणी काळभोर मेट्रो मार्ग, ८८ किलोमीटरचा रिंगरोड, रिंगरोड मार्गावर १४ हायटेक सिटी (टीपी स्कीम), रिंगरोड मार्गाच्या बाजूने रेल्वेचे जाळे उभारणे, तसेच खासगी क्षेत्रातून पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे. पीएमआरडीएचे हे मोठे प्रकल्प म्हणजे पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.