चंदननगर : नगर रस्यावर दर्गा येथे यादव पेट्रोलपंपासमोरील बीआरटी बस स्थानकाला पीएमटी धडकल्याने १२ जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेबारादरम्यान घडली.आज दुपारी वाघोलीकडून पुण्याकडे जाणारी पीएमटी बस तुळजाभवानीनगरचा उतार उतरल्यावर यादव पेट्रोलपंपाजवळील बीआरटी स्थानकाला धडकली. या वेळी १२ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर बायपास चौकातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १२ जणांमध्ये एक लहान मुलगा व ११ ज्येष्ठ नागरिक आहेत.त्यात महिला अधिक आहेत.या अपघातात काही जणांचे हातपाय मोडले आहेत, तर काहींच्या मानेला व कमरेला मुक्का मार लागला. काहींच्या तोंडालाही मार लागला आहे.बसचे व स्थानकाचे मोठे नुकसानबस वेगात असल्याने चालकाला बीआरटी सीमाभिंत व बीआरटी बस स्थानक यांच्यातील अंतराचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा.अपघात होऊन एक तास झाला, तरी जखमी प्रवासी बसमध्येच होते. अपघात झाला त्याच क्षणी चालक फरार झाला. वाहक बसमध्ये होता. त्यानेही रुग्णवाहिका बोलावली नाही. त्या ठिकाणाहून प्रवास करणारे राहुल पठारे व राहुल शिरसाट यांनी जखमींना स्वत:च्या गाडीत घालून रुग्णालयात नेले.मर्सिडीज झाली रुग्णवाहिका...अपघात झाला त्याठिकाणी प्रवासी रुग्ण बसमध्ये पडून होते. त्यांना उपचारांसाठी कोणी घेऊन जात नसल्याचे लक्षात आल्यावर तेथून प्रवास करणारे राहुल भाऊसाहेब पठारे यांनी घटना पाहिली व त्यांच्या मर्सिडीज कारमधून ५ जखमींना रुग्णालयात पोहोचविले. अन्य जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी पाठविले.
पीएमटीची बसस्थानकाला धडक, १२ प्रवासी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 3:48 AM