बारामती : खिशात बक्कळ पैसा घेऊन ग्राहक खरेदीसाठी आलेले परंतु शोरुममध्ये मात्र गाड्याच आऊट आॅफ स्टॉक असल्याने बहुसंख्य नागरिकांची गाड्याखरेदीबाबत निराशा झाली. आज सकाळपासून विविध दुचाकी-चारचाकी वाहनांच्या शोरुमबाहेर ग्राहकांची झुंबड उडाली होती. कॅश असूनही डिस्काऊंटमधील गाड्या खरेदीचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ इंजिन असलेल्या सर्व वाहनांवर बंदी घातली आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना घातलेली बंदी ही नामी संधी समजून दुचाकी गाड्यांच्या उत्पादक कंपन्यांनी थेट १५ ते १८ हजार पर्यंत सूट जाहीर केलेली होती. गाड्या खरेदीसाठी ग्राहकांची दोन दिवस धूम उडाली. गाड्यांची नोंदणी करण्याची ३१ मार्च ही शेवटची तारीख असल्याने ग्राहकांची दुचाकीच्या शोरूमवर बुकिंगसाठी झुंबड उडाली होती. अनेक शोरूम्सनी रात्री १२ पर्यंत शोरूम सुरू ठेवली होती. गाड्यांची संख्या कमी असल्याने अनेक ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. विशेष म्हणजे १ एप्रिलपासून या गाड्यांच्या विक्री व नोंदणीवर बंदी घातली आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या गाड्यांवर थेट कंपन्यांनीच ‘डिस्काउंट आॅफर’ दिली. विशेष मागणी होंडा कंपनीच्या दुचाकी स्कूटर, मोटार सायकलला होती. बारामतीच्या सराफ होंडा वितरकाकडे असलेल्या स्कूटर गाड्या हातोहात खपल्या, असे कौशल शहा सराफ यांनी सांगितले. मोटार सायकलच्या खरेदीला देखील ग्राहकांची पसंती होती. हिरोच्या गाड्यांना देखील ग्राहकांची मागणी होती. या कंपन्यांचे बीएस-३ इंजिन असलेल्या सीबीझेड, स्प्लेंडर प्रो या गाड्या उपलब्ध आहेत. या गाड्यांवर साधारणत: साडेबारा हजार रुपये सूट देण्यात आली आहे, अशी माहिती संदीप पवार यांनी दिली. महालक्ष्मी हिरो, कमल बजाज, जे.जे. टीव्हीएस, नवनाथ अॅटो, सराफ होंडा, धनेश सुझुकी, तुळजा मोटर्स, जय बुलेट आदी शोरूममध्ये आॅफरमुळे उशिरापर्यंत गर्दी होती.
खिशात कॅश पण गाड्या ‘आऊट आॅफ स्टॉक’
By admin | Published: March 31, 2017 11:54 PM