पुणे : अल्पवयीन मुलीसोबत मंदिरात प्रेमविवाह केल्याने दिघी पोलिस ठाणे येथे तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पाेक्साे कायदा अपराध्यांना शिक्षा देण्यासाठी आहे. दोन्ही बाजूने प्रेम करणाऱ्यांना वयाच्या बंधनाखाली शिक्षा देणे किंवा वेगळे करण्यासाठी नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला. न्यायालयाने ताे ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपीचा जामीन योग्य त्या अटी-शर्तीवर मंजूर केला आहे.
आरोपी हा मूळचा मध्य प्रदेशचा आहे. त्याने अल्पवयीन मुलीशी मंदिरात प्रेमविवाह केला. त्यानंतर आरोपीच्या गुन्ह्यात मिसिंग तक्रार कलमाची वाढ केली होती. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आरोपी परप्रांतीय असल्याकारणाने तो पळून जाण्याची शक्यता आहे, म्हणून सरकारी वकिलांनी जामीन अर्जास विरोध दर्शविला होता.
पीडिता वैवाहिक जीवन समजण्याइतपत समजदार असून, ती स्वखुशीने आरोपीसोबत राहत होती. आराेपी परप्रांतीय असला तरी तो आधी भारतीय आहे. त्याला घटनेने मूलभूत अधिकार दिलेले आहेत, असा युक्तिवाद आराेपीच्या वकिलांनी केला. ताे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने वकील सुशांत तायडे, प्रज्ञा कांबळे, दिनेश जाधव, जितू जोशी व शुभांगी देवकुळे यांनी कामकाज पाहिले.
पोक्सो हा कायदा अल्पवयीन मुला-मुलींच्या लैंगिक शोषणापासून बचाव व्हावा म्हणून पारित केला होता; परंतु याचा दुरुपयाेग हाेत असल्याचे दिसते. त्यामुळे काही चूक नसतानाही बरीच मुलं चार-पाच वर्षे तुरुंगवास भोगत आहेत. या कायद्यातील काही तरतुदींमुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. पोलिस प्रशासन आणि कोर्टाने या बाबीकडे लक्ष देणे आणि कायदे मंडळानेही लवकरात लवकर पाेक्सो कायद्यात योग्य त्या सुधारणा करणे गरजेचे आहे.
-ॲड. सुशांत तायडे, आरोपीचे वकील