पुणे : नागराज मंजुळे यांची कविता माणूसपणाचे मोल सांगणारी आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांचे बालमित्र बाळासाहेब बनसोडे यांच्य हस्ते झाले. या वेळी प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, डॉ. प्रदीप आवटे आदी उपस्थित होते. या वेळी ‘माझ्या हाती लेखणी नसती तर’ या विषयावर गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. बाळ म्हणाल्या, ‘‘अभिव्यक्ती ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याची साधने बदलू शकतात. नागराज मंजुळे यांनी कवितेतून व्यक्त केलेल्या अभिव्यक्तीतून त्यांचा संघर्ष समोर येतो.’’बनसोडे यांच्याच हस्ते प्रकाशन करण्यामागची भूमिका सांगताना मंजुळे म्हणाले, ‘‘मी एकच कविता लिहिली होती तेव्हा बाळासाहेब यांनी पत्रिकेत माझी ओळख कवी आणि लेखक करून दिली होती. माझ्या हातात लेखणी नसती तरी कशानेही का होईना मनातील संघर्ष उपसतच बसलो असतो.’’व्यवस्थेने हजारो नागराज गाडले गेल्यावर नागराज मंजुळे नावाचा आयकॉन उभा राहिला आहे, असे सांगून डॉ. आवटे यांनी नागराज मंजुळे एका परिप्रेक्ष्यात वाढत असताना त्यांना गवसलेल्या शब्दकळेबद्दल विवेचन केले. श्रीरंजन आवटे यांनी परिचय करून दिला. (प्रतिनिधी)नागराजची कविता ही विद्रोही नाही तर संयत आणि समंजस आहे. त्याचे माणूसपण हे मला त्याच्यातील दिग्दर्शक किंवा कवीपेक्षाही मोठे वाटते.- उमेश कुलकर्णी