पुणे : ‘हे वरदा असा वर दे, भूमीवर रक्त नको सांडू दे, सांडण्याआधी त्याचे शब्द बनू दे, कवितेची ओळ बनू दे’ अशा पद्धतीने जो कवी इतिहास नाकारत नाही त्याची कविता नि:संशय सर्वश्रेष्ठ ठरते. कारण कविता कधी एका काळामध्ये बंदिस्त राहात नाही, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले. विश्व पंजाबी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पंजाबी साहित्यिक व संमेलनाध्यक्ष सुरजितसिंग पातर यांच्या कवितांच्या डॉ. अनुपमा उजगरे यांनी केलेल्या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन डहाके व साहित्यिका प्रभा गणोरकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वात्रटिकाकार रामदास फुटाणे तर प्रमुख पाहुणे म्हणून संंमेलनाध्यक्ष सुरजितसिंग पातर, डॉ. अनुपमा उजगरे तसेच सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार व चरणदीप सहानी उपस्थित होते. डहाके म्हणाले, ‘‘पंजाबसारख्या राज्याने जे दु:खाचे डोंगर अनुभवले ते क्वचितच कुणाच्या वाट्याला आले असतील. लेखनाच्या माध्यमातून कवी व्यक्तिगत नव्हे तर मानवतेच्या भावना व्यक्त करताना दिसतात. त्यामुळेच कविता एका विशिष्ट काळात मर्यादित राहात नाही.’’
कविता काळामध्ये बंदिस्त नाही
By admin | Published: November 18, 2016 6:14 AM