पुणे : ‘केशी तुझीया फुले उमलतील, तुला कशाला वेणी? चांदण्यास शिणगार कशाला, बसशील तेथे लेणी!’, ‘पांडुरंग त्राता, पांडुरंग दाता, अंतिचा नियंता पांडुरंग’ अशा एकाहून एक सरस कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. काव्याची बरसात झाल्याने रसिक त्यामध्ये चिंब भिजून निघाले. वसंत ऋतू सुरू झाल्याने जाणवणाऱ्या उष्मावर या काव्यबरसातीने सर्वांची मने सुखावली. ‘बाकीबाब’ यांच्या कवितांसोबतच त्यांचा जीवनपटच या वेळी उलगडला. निमित्त होते कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितांच्या ‘बाकीबाब’ या कार्यक्रमाचे. अनन्वय संस्थेतर्फे बोरकर यांच्या कवितांवर आधारित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जन्माने गोव्याचे असले, तरी मराठी भाषेवर निस्सिम प्रेम करणारे बोरकर यांच्या ‘माझ्या गोव्याच्या भूमित गड्या नारळ मधाचे, कड्याकपारीमधोनी घट फुटती दुधाचे’ या कवितेने रसिकांची दाद मिळवली. ‘असा कसा मी तरुण निरंतर, स्वैर करे संचार प्रतिभे, पिलांस फुटुनी पंख तयांची, येथे कर माझे जुळती’ अशा विविध कवितांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमाची संहिता आणि दिग्दर्शन डॉ. माधवी वैद्य यांचे होते. संगीत व काव्यगायन अमृता कोलटकर, तर काव्यवाचन व निवेदन केतकी करंदीकर आणि परिमल केळकर यांनी केले.बोरकर यांच्या जन्मापासून ते अखेरच्या क्षणापर्यंतच्या काव्याचा धांडोळा या वेळी घेण्यात आला. खट्याळ, मिश्कील, अभिमानी, कनवाळू अशा बोरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या वेळी उलगडले. तसेच त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांचा उल्लेखही करण्यात आला.
‘बाकीबाब’च्या काव्याची बरसात; बा. भ. बोरकर यांच्या कवितांचे पुण्यात वाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:49 AM
‘केशी तुझीया फुले उमलतील, तुला कशाला वेणी? चांदण्यास शिणगार कशाला, बसशील तेथे लेणी!’, ‘पांडुरंग त्राता, पांडुरंग दाता, अंतिचा नियंता पांडुरंग’ अशा एकाहून एक सरस कवितांनी उपस्थितांची मने जिंकली.
ठळक मुद्देअनन्वय संस्थेतर्फे बोरकर यांच्या कवितांवर आधारित आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम बोरकर यांच्या जन्मापासून ते अखेरच्या क्षणापर्यंतच्या काव्याचा घेण्यात आला धांडोळा