पुणे : महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत चालणार्या कमला नेहरू पार्क मधील साहित्यिक कट्ट्यावर कवीसंमेलनाने रंगत आणली. हिरवाईने नटलेल्या उद्यानात अनेक नामवंत कवींनी आपल्या कविता सादर करून आनंदाचे तुषार शिंपले. जीवनातील अनुभवांची शिदोरी वाढत गेल्यावर ती शब्दबद्ध करून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे काव्य होय. कमी शब्दात मोठा आशय कवी व्यक्त करीत असतो, असे मत प्राचार्य शाम भुर्के यांनी सांगितले. 'स्त्री' ही कविता भारती पांडे यांनी सादर केली. स्त्री आणि वृक्ष हे नेहमी दुसर्यासाठी काही ना काही करीत असतात. तरीही झाडाला सदैव पुल्लिंगी का संबोधतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अश्विनी पिंगळे, मंजुषा आचरेकर, बाबा ठाकूर, संगीता पुराणिक, श्रीकृष्ण शाळीग्राम, रवींद्र देशमुख, सुजाता शेंडे यांनीही अनुक्रमे विठ्ठल, तपस्वी वृक्ष, संगीतकार, पावसाची ओढ व नशीब या कविता सादर केल्या.कट्ट्याच्या निमंत्रक नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘‘कविसंमेलनाला कायमच उदंड प्रतिसाद मिळतो. या कवीसंमेलनाने दिवाळीच्या आनंदपर्वास प्रारंभ झाला आहे.अलका घळसासी यांनी आभार मानले.
हिरवाईने नटलेल्या उद्यानात नामवंत कवींनी कवितांतून शिंपले आनंदाचे तुषार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:10 PM