पुणे : 'समीक्षकांनी कवितेची समीक्षा चांगली केली काय किंवा वाईट केली काय त्यामुळे कवीच्या मोठेपणात काहीच फरक पडत नाही. समीक्षकांना आवडेल असे लेखन करणारे कवी असतात. आम्ही मात्र नैसर्गिक कविता लिहीत असतो. मानधन किंवा मोबदल्यापेक्षा रसिकांचा आनंद महत्त्वाचा असतो. कवीला तोंडदेखली प्रतिष्ठा नको असते. कवींनी कवी कुळाला बट्टा लागेल असे वर्तन कधी करू नये. कवीची प्रतिष्ठा कवींनाच सांभाळावी लागते. कवी हाच कवितेचा खरा समीक्षक असतो.' असे मत प्रसिद्ध कवी हेमंत जोगळेकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'एक कवी एक कवयित्री' या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी ज्येष्ठ कवयित्री वृषाली किन्हाळकर आणि कवी हेमंत जोगळेकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते. हेमंत जोगळेकर म्हणाले, 'विडंबन काव्य उत्स्फूर्त असावं. कवींनी पूर्वसुरींच्या कविता वाचल्या पाहिजेत. विडंबनकार हा उत्तम कवी असायला हवा. मी मुळातला कवी आहे आणि नंतर अभियंता झालो. माझी कविता अशास्त्रीय नाही. स्पष्टपणा हाच कवींचा मूलभूत गुण असतो. मी गंभीर स्वभावाचा आहे पण माझी कविता मिश्किल आहे.'डॉ. वृषाली किन्हाळकर म्हणाल्या, 'आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी हेच माझं प्रेरणास्थान आहे. समाजातील गरीब स्त्रियांनी माज्या जाणीवा समृद्ध केल्या आहे. स्त्रीवर होणारा अन्याय, त्यांची तडफड, त्यांच्या वेदना आणि वास्तव माज्या संवेदनांना जागृत करतात. दु:खांची पाळेमुळे शोधतांना चांगली कविता सापडते. डॉक्टर असल्यामुळे मी स्त्री जन्माचा सोहळा रोज पाहते तसा तिच्या मृत्यूचा पाहावा लागतो. स्त्रीच्या वेदनेचा प्रभाव माझ्यावर आहे. बाईचं दु:ख मला खेचून घेतं. महिलांकडे आदरानं न पाहणं, राजकारणावर टीका करणं हे चुकीचे आहे. कवीचे मठ आणि मठातलं राजकारण मला आवडत नाही. संवेदनांना त्रास झाला तरच चांगली कविता समोर येईल.'प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद आडकर यांनी आभार मानले.
कवी हाच कवितेचा समीक्षक : हेमंत जोगळेकर; मसापमध्ये ‘एक कवी एक कवयित्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 3:52 PM
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'एक कवी एक कवयित्री' या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी ज्येष्ठ कवयित्री वृषाली किन्हाळकर आणि कवी हेमंत जोगळेकर यांच्याशी संवाद साधला.
ठळक मुद्देमसापमध्ये कवयित्री वृषाली किन्हाळकर आणि कवी हेमंत जोगळेकर यांच्याशी संवादविडंबन काव्य उत्स्फूर्त असावं : हेमंत जोगळेकर