लक्ष्मण मोरे
पुणे : मुलांना ऑनलाईन शाळा शिकावी लागेल, मोबाईल अथवा टीव्हीच्या स्क्रीनवर पाहून मुले धडे गिरवतील असे कधी कुणाच्या स्वप्नीही आले नसेल. तसा विचार जर कोणी २५-३० वर्षांपूर्वी मांडला असता तर त्याला लोक 'वेडा' म्हणाले असते. अशाच एका वेड्या कवीची एक कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 'टीव्हीवरची शाळा' असे या कवितेचे नाव असून १९९१ सालच्या किशोर मासिकात ही कविता प्रसिद्ध झाली होती.
सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वत्र लॉकडाऊनमुळे एक प्रकारचे शैथिल्य आले आहे. नोकरी, व्यवसाय, धंदे आणि उद्योग बंद आहेत. त्याला, शाळा आणि महाविद्यालयेही अपवाद राहिलेली नाहीत. मुलांच्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. शाळांकडून मोबाईलवर शैक्षणिक व्हिडीओ पालकांना पाठविले जात आहेत. पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ अथवा ऑनलाईन स्क्रीनवर मुले आपल्या नव्या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम शिकत आहेत. हे सर्व प्रौढ आणि वृद्ध व्यक्तींना ऑनलाईन शाळेचे 'गणित' अद्यापही रुचत नसले तरी ती आजची आवश्यकता बनून राहिली आहे.
सध्या भरणाऱ्या ऑनलाईन शाळेचा गंमतशीर विचार एका कवितेमधून १९९१ साली मांडण्यात आला होता. कवी राम अहिवळे यांनी केलेली ही बाल कविता किशोर मासिकाच्या १९९१ सालच्या डिसेंबर महिन्याच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती. जर घरातल्या टीव्हीवर शाळा भरली तर किती धमाल येईल, मुले किती आनंदी होतील, डोके नवे कॉम्प्युटर होईल, गणिताचा कसा धुव्वा उडेल, विविध विषयांच्या टीव्हीवर मालिका दाखविल्या जातील अशा कल्पना मांडून मुलांचे रंजन करण्याचा प्रयत्न या कवितेमधून करण्यात आलेला आहे. टीव्हीवरच्या शाळेत ना अभ्यास, ना गृहपाठ गण्यासारख्या कविता होतील पाठ असे सांगत सिनेमासारखी अवघी तीन तासांची शाळा भरेल आणि सर्वजण पहिल्या क्रमांकाने पास होतील असे गमतीने म्हटले असले तरी तेच चित्र आज प्रत्यक्षात पहायला मिळते आहे. टीव्हीवरच्या शाळेत खूप मजा येईल, पण खेळाच्या तासाचे कसे काय होईल या प्रश्नाने कवितेचा झालेला शेवटही आजच्या 'ऑनलाईन शाळे'ला तंतोतंत लागू पडतो. आजच्या परिस्थितीशी सुसंगत आणि अगदी चपखल बसणारी ही कविता प्रचंड व्हायरल झाली असून तीस वर्षांपूर्वीची बाल कल्पना कोरोनाच्या निमित्ताने आज प्रत्यक्षात उतरली आहे. ----------किशोर मासिकाच्या १९९१सालच्या डिसेंबर महिन्याच्या अंकात कवी राम अहिवळे यांची ही कविता प्रसिद्ध झाली होती. तब्बल २८ वर्षानंतर ही कविता कालसुसंगत भासत असल्याने प्रचंड व्हायरल झाली आहे. मला शेकडो लोकांकडून राज्य भरातून ही कविता व्हॉट्सअपवर आली. आम्ही कवी राम अहिवळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यांचा पत्ता व दूरध्वनी उपलब्ध होत नाहीये. - किरण केंद्रे, कार्यकारी संपादक, किशोर मासिक