पुणे :'घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती' ही गाजलेली कविता लिहिणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री विमल लिमये (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले.
हिंदी विषयाच्या शिक्षिका असलेल्या लिमये यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३० ला सातारा येथे झाला. मराठी, हिंदी साहित्याच्या अभ्यासक असल्याने विपुल वाचनासोबतच त्यांनी काव्यलेखन व लहान मुलांसाठी दर्जेदार लेखन केले. त्यांच्या 'घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती' या अजरामर कवितेमुळे जगभरातील मराठी रसिकांच्या मनात त्यांचे नाव कोरले गेले. ख्यातनाम संगीतकार श्रीधर फडके यांनी या कवितेला चाल लावली होती. अनेक ठिकाणी ही कविता पोस्टर करुन लावलेली आढळते. विमल लिमये यांचा स्वभाव प्रसिद्धीपराड्मुख असल्यानेअनेकांना ही कविता त्यांची आहे हेही माहीत नव्हते. झरोका, अंत:स्वर, प्रसाद तर लहान मुलांसाठी लिहिलेला चन्या-मन्या हे त्यांचे कवितासंग्रह विशेष लोकप्रिय होते.
पुण्यातील विविध साहित्य संस्था, सामाजिक संस्था तसेच गानवर्धन या सांगीतिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विपुल अशी साहित्य, सामाजिक व संगीतसेवा केली. शुक्रवारी (६ जुलै) वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साहित्य व संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी त्यांच्या कन्या सुनीत लिमये, वासंती ब्रह्मे, जावई मकरंद ब्रह्मे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मृणालिनी चितळे, दीपक करंदीकर, जयंत भिडे, गोविंदराव बेडेकर, प्रसाद भडसावळे, रविंद्र दुर्वे, मधुसूदन घाणेकर, प्रदीप निफाडकर आदी उपस्थित होते.