नम्रता फडणीस
पुणे : ‘महाकाव्य शिवप्रताप’ हे मराठी भाषेतील १९ वृत्तांतले पहिले वृत्तबद्ध महाकाव्य शिवप्रेमी मंडळींना वाचायला मिळणार आहे. वयाच्या १६ व्या वर्षी चिन्मय मोघे याने ‘कवी समर’ या नावाने हे संपूर्ण महाकाव्य अवघ्या ५० दिवसात लिहून पूर्ण केले. या ग्रंथाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना असून, कै. दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचा ग्रंथात समावेश आहे.
चिन्मय मोघे याने चार वर्षांपूर्वी ग्रंथ लिहून पूर्ण केला; परंतु कोरोनामुळे पुस्तकाचे प्रकाशन रखडले. आता त्याचे वय २० वर्ष आहे. पुरंदरे प्रकाशनाने हा ६५० पानी ग्रंथ नुकताच प्रकाशित केला आहे. या मराठीतील पहिल्या वृत्तबद्ध महाकाव्याविषयी ‘लोकमत’शी बोलताना चिन्मय मोघे म्हणाला, शिवाजी महाराजांवर महाकाव्य लिहिण्याची खूप इच्छा होती; पण ते लिहिण्यापूर्वी मी काही एक-दोन पोवाडे रचले आणि महाकाव्याचे ३००० श्लोकलिहून पूर्ण केले. त्यापूर्वी महाकाव्य कसं असतं, हे बघण्यासाठी मी रामायण आणि महाभारत वाचले. ही दोन्ही महाकाव्य छंदबद्ध स्वरूपात आहेत.
मला महाकाव्य हे पूर्णत: वृत्तात करायचे होते. छंदात अक्षर ठरलेली असतात; पण शंभर श्लोक जर एका वृत्तात लिहित असू तर त्याचे तिसरे अक्षर हे ऱ्हस्वच असायला हवे. हा काव्याच्या गणिती भाषेचा नियम आहे. शंभर वर्षांपूर्वी सावरकरांनी वृत्तबद्ध पोवाडे रचले होते. ती परंपरा काहीशी खंडित झाली होती. ती पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. या महाकाव्यासाठी स्वत: अभंगज्योती या वृत्ताची रचना केली. भुजंगप्रयात, राजहंस, चंद्रकांत आदी वृत्त प्रामुख्याने वापरली आहेत. हे वृत्तबद्ध गेय, लयबद्ध आणि प्रमाणबद्ध असे काव्य आहे.
लवकरच दोन कादंबऱ्या येणार
छत्रपती शिवाजी महाराजांवर महाकाव्य लिहिण्यामागचे हे कारण देखील आहे की महाकाव्याला असाच नायक अभिप्रेत आहे. ज्याचे दिव्य चरित्र आहे. त्यामुळे महाकाव्यासाठी शिवाजी महाराजांचेच नाव डोळ्यासमोर आले. याकरिता महाराजांची पत्रे वाचली. त्यांच्या समकालीन कवींनी त्यांच्यावर केलेल्या संस्कृत रचना वाचल्या. हे महाकाव्य अगदी सामान्य व्यक्तींनादेखील वाचता येऊ शकेल, सर्वांना पाठ करता येईल अशाच पद्धतीनेच लिहिले आहे. लवकरच माझ्या 'तथागत बुद्ध' आणि 'उर्मिला' या कादंबऱ्या प्रकाशित होणार असल्याचे चिन्मयने सांगितले.