कान्हूर मेसाई - कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम प्रशालेतील ४१ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून देण्यात येणारी खिचडी खालल्यानंतर काही मुलांना मळमळ व उलट्या सुरू झाल्या. ही घटना शनिवारी (दि. २२) रोजी घडली. ३७ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर ऋतुजा अशोक खैर,े अश्विनी भगवंत जगदाळे, पायल सुरेश ननवरे, अजिंक्य संदीप दळे (सर्व रा.कान्हूर मेसाई) या चार जणांना मंचर येथे रुग्णालयात दाखल केले. तसेच ३७ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.याबाबत मिळालेली माहिती अशी, की विद्याधाम हायस्कूलमधील सुमारे तीनशे सत्तर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेतून खाद्य वाटप करण्यात येते. शनिवारी नेहमीप्रमाणे शालेय पोषण आहार योजनेतून विद्यार्थ्यांना मुगाची खिचडी सकाळी ९.४५ वाजता वाटप करण्यात आली. सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर मळमळ होत असल्याची तक्रार शिक्षकांकडे केली. प्राचार्य एम. एन. माने यांनी तातडीने खिचडी वाटप थांबविले. काही विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. सुमारे ४१ विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना कान्हूर मेसाई येथील बाबाजी लंघे यांचच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. ४१पैकी ३७ विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. तत्पूर्वी शिरूर येथील शासकीय रुग्णालयातील डॉ. शिंदे यांना फोन करताच त्यांनी व कवठे येमाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर नामदेव पाणगे, डॉ. चव्हाण हे कान्हूरमेसाई येथे तातडीने दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांवर उपचार केले. चार विद्यार्थ्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना मंचर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.संबंधित शाळेची माहिती कळताच गट शिक्षण अधिकारी बी. एन. कळमकर, शालेय पोषण आहार अधीक्षक अंकुश शहागटवार व संभाजी पवार यांनी ताबडतोब शाळेत येऊन विद्यार्थ्यांची चौकशी केली. या वेळी शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वासआबा कोहकडे यांनीपाहणी केली.
विद्याधाम प्रशालेतील ४१ विद्यार्थ्यांना विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 12:18 AM