लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गाडीतील पेट्रोल काढताना पकडून ताब्यात दिलेल्या एकाला मारहाण करून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून चौघा पोलीस कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी हे आदेश दिले. रवींद्र बापूराव चक्रे, जितेंद्र गायकवाड (दोघेही वय ३५), मंगेश बिच्चे (वय ४०) आणि संजय कुलकर्णी (वय ४२) अशी मुक्तता झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सचिन राजगुरू (वय २०, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) यांनी यासंदर्भात चतु:शृंगी पोलिसांत फिर्याद दिली होती. उदय भडंगे (वय २१, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. २९ आॅगस्ट २००४ रोजी रात्री औंध पोलीस चौकीत ही घटना घडली होती. सचिन राजगुरू आणि उदय भडंगे हे ताडी पिण्यासाठी सांगवी नदी परिसरात गेले होते. त्यांना भूक लागल्याने ते औंध परिहार चौकाकडे आले. मात्र, तेथे त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे त्यांनी एका कारमधून बॉटलमध्ये पेट्रोल काढले. तेव्हा नागरिकांनी त्यांना पकडले. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी त्यांना चौकीत नेऊन मारहाण केली. त्यात भडंगे बेशुद्ध पडल्याने पोलिसांनी त्याला सचिन राजगुरू याच्याबरोबर गाडीवर बसवून घरी पाठविले.घरी आल्यानंतर भडंगे यांच्या आई-वडिलांना संशय आल्याने त्यांनी कोटबागी हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी नेले. तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर यासंदर्भात फिर्याद देण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात गुन्हा निष्पन्न होत नसल्याचा अहवाल देण्यात आला होता. याप्रकरणी विधिमंडळात लक्षवेधी मांडण्यात आली होती.
मृत्यूप्रकरणातून पोलीस कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता
By admin | Published: July 06, 2017 3:34 AM