लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील वेगवेगळ्या भागांत गर्दीच्या चौकात सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या १३ तृतीयपंथीयांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. याबाबत वाहनचालकांकडून पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.
पुणे-सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, मुंबई-पुणे रस्ता तसेच शहरातील महत्त्वाच्या चौकात थांबलेल्या तृतीयपंथीयांकडून वाहनचालकांची अडवणूक करत आहे. त्यांच्याकडून पैसे घेतले जात असून याबाबत पोलिसांकडे तक्रारी आल्या होत्या. उपनगरातील चौकात असे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत होते. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने येरवड्यातील सादलबाबा चौक, हडपसर येथील लोणी टोलनाका, बंडगार्डन परिसरातील घड्याळ चौक, सारसबागेसमोरील चौक, पौड रस्त्यावरील करिश्मा सोसायटी चौक येथे कारवाई केली. नागरिकांना अडवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या १३ तृतीयपंथीयांविरोधात महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम कलम ४ (१) नुसार कारवाई केली.