लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : सावकारीसह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या बारामती येथील रंजना वणवे ऊर्फ ‘वणवेबाई’ या महिलेला तडीपार करण्यात आले आहे. वणवे हिच्यावर सावकारी कर्जाच्या वसुलीसाठी बारामती तालुक्यातील एका कुटुंबाच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचबरोबर चोरी, मारहाणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार या महिलेला पुणे, नगर, सोलापूर या ३ जिल्ह्यातुन तडीपार करण्यात आले आहे. सावकारीसह विविध गंभीर गुन्हे या महिलेवर दाखल असल्याने तिच्या तडीपारीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर पुणे ग्रामीण अधीक्षकांनी तडीपारीचा प्रस्ताव उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. त्यानुसार रंजना वणवे या महिलेला दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सध्या ही महिला फरारी आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. दोन वर्षापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याचदरम्यान बेकायदा सावकारी पैशाच्या वसुलीसाठी भर दिवसा तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर तिच्यावर गून्हा दाखल होता. चोरी, दरोडा, अपहरण, घरात घुसून मारहाण करणे, बाल लैंगिक अत्याचार आदी गुन्हे दाखल आहेत. एप्रिल २०१७ मध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर अनेक साक्षीदार आणि चौकशी करून दि. ५ जून रोजी तडीपारीचे आदेश देण्यात आले. बारामतीच्या एमआयडीसी भागात विद्या कॉर्नर या इमारतीमध्ये आरटीओ एजंट म्हणून रंजना वणवे हीने कार्यालय थाटले होते. याच इमारतीमध्ये आरटीओ कार्यालय त्या वेळी कार्यरत होते. या कार्यालयातदेखील तिची चांगलीच दहशत होता.
‘वणवेबाई’वर पोलिसांची तडीपारीची कारवाई
By admin | Published: June 21, 2017 6:25 AM