सांगवी : मागील वर्षी झालेल्या कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी यंदाच्या वर्षी कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, त्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. सर्व सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सतर्क आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी दिली.
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जात असलेल्या भीम अनुयायांची माळेगाव दूरक्षेत्राच्या अधिपत्याखाली येणाऱ्या गावातील पदाधिकारी व तरुणांची सूचना व उपाययोजनाविषयक बैठक घेण्यात आली होती. या वेळी पोरे बोलत होते. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राभरातून अनुयायी यांची जास्त प्रमाणात गर्दी होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे विपरीत घटना घडू नये, या दृष्टिकोनातून प्रशासनाने त्याठिकाणी जाऊन दि. १ जानेवारीच्या अगोदर सर्व पाहणी करून घ्यावी. तर सोशल मीडियावर वॉच ठेवण्यात यावा. प्रथमत: समाजात विष पेरणाºया लोकांना आळा घालून, संबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना करण्यात याव्या. तर जाताना-येताना केडगाव, चौफुला येथे मागील वर्षी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात यावा. अनुयायांसाठी पाण्याची व्यवस्था करून, दूरवरून येणाºया अनुयायांच्या वाहनांची सुरक्षा राहावी यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. अशा कार्यकर्त्यांनी सर्व सूचना मांडत आमच्याकडून अनुचित प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. तर, पोलीस अधिकारी व पदाधिकारी यांच्यात चर्चात्मक संवाद झाला. या वेळी माजी उपसरपंच भानुदास जगताप, अनिल जगताप, मधुकर मोरे, संघर्ष गव्हाळे, विश्वास भोसले आदींनी सूचना मांडल्या. या वेळी पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड, पोलीस हवालदार शेंडगे, जयंत ताकवणे, महादेव जगताप, माऊली कांबळे, आदी उपस्थित होते.