पुणे : डी जे बंद करायला सांगितल्याचा राग आल्याने एका मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांवर धावून आले. काही काळ पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. त्यामुळे टिळक रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण होते.
डी जे ला उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असताना पुण्यातील अनेक मंडळांनी नियम पायदळी तुडवत डी जे चा दणदणाट केला. पोलीस अशा मंडळांवर कारवाई करत होते. एक मंडळ स.प.महाविद्यालयाच्या येथे आले असताना पोलिसांनी मंडळाला डी जे चा आवाज कमी करण्यास सांगितले. मंडळाने त्याला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी डी जे बंद करण्यास सांगितले. यातून पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. कार्यकर्ते थेट पोलिसांच्या अंगावर धावून आले. त्यामुळे काहीकाळ टिळक रस्त्यावर तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान डी जे चा दणदणाट करणाऱ्या मंडळांवर पोलीस कारवाई करत आहेत. अनेक मंडळे ही डी जे वाजवत आहेत परंतु अलका चौकात आल्यानंतर डी जे बंद केला जात आहे. डी जे ला यंदा बंदी घातल्याने दरवर्षी पेक्षा यंदा मिरवणूका लवकर मार्गस्थ होत आहेत.