अतुल चिंचली -पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत भवानी पेठेत फिरत असलेल्या एका महिलेला निवारा देण्याचे कार्य पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या सयुक्तिक मोहिमेने केले आहे. सोलापूरमधील एक महिला गेली दोन, तीन दिवस सोमवार पेठ, भवानी पेठ या भागातून फिरत होती. या परिस्थितीत नागरिकांकडून महिलेची विचारपूसही होत नव्हती. भवानी पेठेतील रहिवाशांनी या महिलेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला खूपच घाबरली असल्याने काही सांगण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले. या भागातील रहिवासी नयन जठार यांनी पुढाकार घेऊन महिलेची राहण्याची व्यवस्था करण्याचे ठरवले. अशावेळी त्यांनी भवानी पेठ क्षत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर आणि समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्याशी संपर्क साधला. पोलीस आणि महानगरपालिका यांच्या सयुक्तिक मोहिमेने महिलेला निवारा मिळाला. सोमनाथ बनकर म्हणाले, रात्री उशिरा मला नयन जठार यांचा फोन आला. त्याच वेळी मी कदम यांच्याशी संपर्क साधून महिलेची व्यवस्था करण्याच्या तयारीला सुरुवात केली. या महिलेची पुणे स्टेशनजवळील निवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्याचे ठरवले. महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत या निवारा केंद्रात व्यवस्था करावी. अशी समाज कल्याण विभागाचे समीर इंदलकर यांना विनंती केली. रात्री बारापर्यंत निवारा केंद्रात त्या महिलेला आश्रय मिळाला. महिलेला योग्य निवारा मिळावा अशीच आमची भूमिका होती. ...................................................................गेली दोन, तीन दिवस ही महिला फिरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशी माहिती नागरिकांकडून आम्हाला मिळाली. ती महानगरपालिकेचे बनकर साहेब आणि आम्ही एकत्र काम करून महिलेची व्यवस्था केली आहे. ही महिला खूपच घाबरली असल्याने ती बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. त्यामुळे तिच्याकडून माहिती घेणे अशक्य होते. महिला सोलापूरची असून तिचे नाव फक्त कळाले आहे.बाळकृष्ण कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन
'कोरोना हॉटस्पॉट' भागात रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार महिलेला पोलीस व महापालिकेमुळे मिळाला निवारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 4:04 PM