लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘अल्पवयीन मुलीवर १३ आरोपींनी केलेल्या अत्याचाराची घटना निषेधार्ह आहेच. या दृष्टीने सर्व प्रकारच्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जातील. नियमांची योग्य अंमलबजावणी न करणाऱ्या निवासी हॉटेल, लॉजवर पोलिसांची करडी नजर असेल. नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.
मित्राला भेटण्यासाठी बिहारला निघालेल्या १४ वर्षांच्या मुलीचे मदतीच्या बहाण्याने रिक्षातून अपहरण करीत तिच्यावर १३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार सोमवारी (दि. ६) उघड झाला. या मुलीचे पुणे रेल्वे स्टेशनमधून अपहरण करण्यात आले. या घटनेच्या निमित्ताने शहरातील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर गुप्ता यांनी ही माहिती दिली.
‘पुणे, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, तसेच वाकडेवाडी, स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकातून दररोज हजारो प्रवाशांची ये-जा होते. त्यातील अनेक प्रवासी रिक्षा, पीएमपी आणि कॅबद्वारे प्रवास करतात. या प्रवासादरम्यान प्रवाशांची सुरक्षा वाढावी, अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी पोलीस आराखडा तयार करीत आहेत. अत्याचार होण्याची शक्यता असलेली ठिकाणे शोधली जाणार असून, तेथे आवश्यक खबरदारीचे उपाय राबविणार आहे,’ असे गुप्ता यांनी सांगितले.
चौकट
विशेष सरकारी वकिलांची मागणी
‘वानवडी पोलीस ठाण्यात दाखल सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलांच्या (पीपी) नियुक्तीसाठी राज्य शासनाशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. पोस्को कायद्यानुसार आरोपींवर वेळेत दोषारोपपत्र दाखल केले जाणार असून, खटल्याची सुनावणी वेळेत सुरू होईल,’ असे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
चौकट
रिक्षा चालकांना चाप, स्टेशनात सीसीटीव्ही
‘पुणे रेल्वेस्थानकात ये-जा करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्याद्वारे २४ तास नजर ठेवली जाणार आहे. पुणे रेल्वेस्थानकाच्या आवारात येणाऱ्या सर्व रिक्षा, कॅबचालकांची पडताळणी केली जाणार असून, त्यांचा ‘डेटा बेस’ तयार केला जाणार आहे,’ असे लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले.
सदानंद वायसे पाटील म्हणाले, ‘रेल्वेस्टेशनच्या आवारापर्यंतच लोहमार्ग पोलिसांची हद्द आहे. त्यापुढे बंडगार्डन पोलिसांची हद्द सुरू होते. मात्र, हद्दीचा वाद न घालता शहर पोलिसांसोबत एकत्रितपणे गस्त घातली जाईल. पुणे रेल्वेस्थानकाच्या चारही प्रवेशद्वारांवरील सीसीटीव्हींची संख्या वाढविली जाईल. रेल्वेस्थानकाच्या आवारात येणारे रिक्षाचालक, कॅॅब चालकांचे छायाचित्र, आधार कार्ड, संपर्क क्रमांक, त्यांच्या वाहनाची माहिती आदी तपशील संकलित करून ती तेथील पोलिसांकडे दिली जाईल. या डेटा बेसमध्ये नसलेला रिक्षा-कॅॅबचालक आवारात आल्यास त्याला जाब विचारला जाईल.’
चौकट
‘बॉडी शोल्डर कॅमेऱ्या’ची मागणी
पोलिसांच्या शरीरावर सीसीटीव्ही कॅमेरा लावून त्याद्वारे परिसरातील हालचाली टिपल्या जातात. रेल्वेस्थानकाच्या आवारात असे कॅमेरे धारण केलेल्या पोलिसांमार्फत गस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी ‘शोल्डर कॅमेऱ्यां’ची मागणी करण्यात आली आहे. गणवेशातील पोलिसांसोबतच साध्या वेशातील पोलिसांचाही बंदोबस्त स्थानक परिसरात वाढविण्यात येणार आहे.