पुणे : संजीव कुमार आणि अमिताभ बच्चन यांचा गाजलेला ‘त्रिशुल’ चित्रपट सर्वांना माहिती असेल़ त्यात अमिताभ बच्चन संजीव कुमार याच्या कंपनीतील अधिकाऱ्याला फोडून त्याच्याकडून टेंडरची माहिती घेत व त्याच्यापेक्षा १ रुपया कमी किंमतीचे टेंडर भरुन ते काम मिळवत असे़ असा काहीचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. फक्त येथील एका अधिकाऱ्याने आपल्याच पत्नीच्या नावावर दुसरी कंपनी स्थापन करुन तो काम करत असलेल्या कंपनीपेक्षा कमी किंमतीचे टेंडर भरुन काम मिळविल्याचे उघड झाले आहे. सिंहगड रोड पोलिसांनी या व्यवस्थापकाला अटक केली आहे. प्रविण पुरुषोत्तम शेंडे (रा. श्रमिकनगर, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.याप्रकरणी सुनिल चांदोरकर (वय ४७, रा़ सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदोरकर यांचे त्रिमुर्ती स्टेनलिंक इक्विपमेंटस या नावाची कंपनी आहे. त्यात प्रविण शेंडे हे व्यवस्थापक या पदावर काम करीत होते. त्यांच्याबरोबर कंपनीने नॉन डिस्क्लोजर अॅग्रीमेंट (कंपनीची गुप्त व महत्वाची माहिती प्रसिद्ध व उघड न करण्याबाबतचा करार) तसेच नोकरीच्या कालावधीत पालन करावयाच्या अटी व शर्तीचा घोषवारा याचा करार झाला होता. असे असताना शेंडे याने आपल्या पत्नीच्या नावाने एस़ एम़ इंजिनिअर्स अँड ट्रेडर्स, श्रीमीरा ट्रान्सपोर्टेशन ट्रेडर्स या कंपन्या स्थापन केला. चांदोरकर यांचे कंपनीपेक्षा ग्राहकांना हव्या असलेल्या मालाचे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांचे कंपनीपेक्षा कमी किंमतीत त्यांचे कंपनीचे कोटेशन पुरवून त्याच्या साथीदारामार्फत माल पुरविला़ तसेच चांदोरकर यांचे कंपनीस तोटा होऊन त्यांचे स्वताचा आर्थिक फायदा होईल, या उद्देशाने कंपनीच्या मेल आयडीवरुन स्वत:च्या मेल आयडीवर चांदोरकर यांच्या कंपनीची माहिती ट्रान्सफर करुन फिर्यादी यांचा विश्वासघात व फसवणूक करुन ३५ ते ५० लाख रुपयांचा अपहार केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत सुरु होता़ सिंहगड रोड पोलिसांनी प्रविण शेंडे यांना अटक केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
‘त्रिशुल’ चित्रपट स्टाईलप्रमाणे कंपनीची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 10:04 PM
विश्वासघात व फसवणूक करुन ३५ ते ५० लाख रुपयांचा केला अपहार
ठळक मुद्देसिंहगड रोड पोलिसांनी या व्यवस्थापकाला केली अटक