पुणे: जालना येथे अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती ३ लाख रुपये ठरल्यानंतर त्यापैकी २ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून उपविभागीय पोलीस अधिकारी व दोन पोलीस कर्मचार्यांना जालना येथे पकडले़.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर अशोक खिराडकर (वय ४५, रा. जालना) आणि पोलीस नाईक संतोष निरंजन अंभोरे (वय ४५, रा. कदिम पोलीस ठाणे, जालना) व पोलीस काँस्टेबल विठ्ठल पुंजाराम खार्डे (नेमणूक एस. डी. ओ. जालना कार्यालय, रा. कडवंचीवाडी, ता जि़. जालना) अशी त्यांची नावे आहेत.
जालना येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा कार्यभार पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्याकडे आहे. जालना येथील पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिराडकर याने संतोष अंभोरे व विठ्ठल खार्डे यांच्यामार्फत ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार करण्यात आली. कारवाईची गुप्ता राखण्यासाठी पुण्यातून पथक पाठविण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, काँस्टेबल किरण चिमटे, दिनेश माने यांचे पथक जालनाला पोहचले. त्यांनी १८ व १९ मे रोजी या तक्रारीची पडताळणी केली. त्यात तडजोडीअंती ३ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार त्यातील पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये देण्यात येणार होते. पोलिसांनी तक्रारदार याच्या घरी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पोलीस नाईक संतोष अंभोरे हा तक्रारदार यांच्या घरी आल्यावर २ लाख रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. सापळा कारवाई यशस्वी होताच इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले असून खिराडकर यांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरु आहे.